Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ‘या’ शहरात मिळताे सर्वाधिक पगार; मुंबईसह देशातील बड्या शहरांना टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 07:37 IST

पगारामध्ये अनुभव खूप माेलाचा ठरताे. २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्यांचा ३८ लाख १५ हजार रुपयांपर्यंत सरासरी पगार आहे.

नवी दिल्ली - नव्या आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास सर्वच संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत निर्णय झालेले आहेत. सर्वाधिक पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील एका शहराने मुंबईसह देशातील सर्व माेठ्या शहरांना मागे टाकले आहे. हे शहर आहे साेलापूर. एका सर्वेक्षणानुसार, साेलापूरमध्ये सर्वाधिक सरासरी वार्षिक पगार २८ लाख १० हजार ९२ रुपये एवढा आहे. तर आर्थिक राजधानी मुंबई या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ‘ॲव्हरेज सॅलरी सर्व्हे’च्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. 

व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात सर्वाधिक पगार आहे. या क्षेत्रात २९ लाख ५० हजार रुपये एवढा सरासरी पगार आहे. विधी क्षेत्र दुसऱ्या स्थानी आहे. या क्षेत्रात २७ लाख रुपये सरासरी पगार असल्याचे अहवालात म्हटले.

अनुभव ठरताे ‘लाख माेलाचा’ : पगारामध्ये अनुभव खूप माेलाचा ठरताे. २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्यांचा ३८ लाख १५ हजार रुपयांपर्यंत सरासरी पगार आहे. सर्वेक्षणात ११ हजारांपेक्षा जास्त लाेकांचा सहभाग हाेता. त्यात ५९ सीईओंसह विविध कंपन्यांचे संचालक,, सरव्यवस्थापक, डाॅक्टर्स, इंजिनिअर्स इत्यादींचा समावेश हाेता.

वार्षिक सरासरी पगार (रु.)    साेलापूर    २८,१०,०९२    मुंबई    २१,१७,८७०    बंगळुरू    २१,०१,३८८    दिल्ली    २०,४३,७०३    भुवनेश्वर    १९,९४,२५९    जाेधपूर    १९,४४,८१४    पुणे    १८,९५,३७०    हैद्राबाद    १८,६२,४०७