Join us  

IRDAI : आरोग्य विमा ग्राहकांना मोठा दिलासा, 'अँटीबॉडी कॉकटेल' घेणार्‍या कोरोना रुग्णांचा क्लेम फेटाळला जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:46 PM

IRDAI : नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, विमा कंपन्या कोरोनाच्या उपचारादरम्यान 'अँटीबॉडी कॉकटेल' घेत असलेल्या रुग्णांचा क्लेम 'प्रायोगिक उपचार' म्हणून फेटाळू शकत नाहीत. तसेच,IRDAI ने त्यांना असे क्लेम निकाली काढण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : आरोग्य विमा ग्राहकांसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणकडून (IRDAI) एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता 'अँटीबॉडी कॉकटेल' घेणाऱ्या कोरोना रुग्णांचे क्लेम विमा कंपन्या नाकारू शकणार नाहीत. IRDAI ने या संदर्भात विमा कंपन्यांना नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, विमा कंपन्या कोरोनाच्या उपचारादरम्यान 'अँटीबॉडी कॉकटेल' घेत असलेल्या रुग्णांचा क्लेम 'प्रायोगिक उपचार' म्हणून फेटाळू शकत नाहीत. तसेच,IRDAI ने त्यांना असे क्लेम निकाली काढण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यास सांगितले आहे.

अनेक विमाधारकांच्या तक्रारी होत्या की, काही आरोग्य विमा कंपन्या उपचारादरम्यान 'अँटीबॉडी कॉकटेल' घेणाऱ्या कोरोना रुग्णांचे क्लेम नाकारत आहेत. तसेच, हा एक "प्रायोगिक उपचार" असल्याचे सांगत आहे. पॉलिसीमध्ये हे समाविष्ट नाही. यासंदर्भात अनेक मीडिया रिपोर्ट्सही समोर आले होते.

डॉक्टर अनेक रुग्णांना अँटीबॉडी कॉकटेल थेरपी देत ​​आहेत कारण कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही अचूक औषध किंवा उपचार विकसित झालेले नाहीत. अँटीबॉडी कॉकटेल थेरपीची किंमत खूप जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, भारतातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये IRDAI ने उचललेले हे पाऊल पॉलिसीधारकांना दिलासा देणारे आहे. 

IRDAI ने  मंगळवारी विविध सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक परिपत्रक जारी करून हे निर्देश दिले आहेत. "आमच्या निदर्शनास आले आहे की विमा कंपन्या कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी 'अँटीबॉडी कॉकटेल' थेरपीवर झालेल्या खर्चासाठी विमा क्लेम नाकारत आहेत. प्रायोगिक उपचारांचे कारण देत, असे क्लेम फेटाळले जात आहेत", असे IRDAI ने म्हटले आहे.  तसेच, अँटीबॉडी कॉकटेल थेरपीला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने केवळ मे 2021 मध्ये आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. अशा परिस्थितीत, ते प्रायोगिक उपचार म्हणून फेटाळण्याचे कोणतेही प्रकरण नाही, असे IRDAI ने सांगितले आहे.

अँटीबॉडी कॉकटेल थेरपी म्हणजे काय?कोरोनाच्या उपचारात वापरले जाणारे अँटीबॉडी कॉकटेल थेरपी हे दोन मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलचे मिश्रण आहे. प्रयोगशाळेत मोनोक्लोनल अँटीबॉडीज तयार केल्या जातात. या अँटीबॉडी कॉकटेलमध्ये दोन औषधे असतात. दोन अँटीबॉडीजच्या वापरामुळे शरीराची कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढते. 

टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्याव्यवसाय