Join us  

ज्येष्ठांनाही आरोग्य विमा, वयाची अट हटवून टाकली; सर्वांसाठी योजना तयार करा, कंपन्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 6:04 AM

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले, महिला, गरोदर माता आदी सर्व घटकांना समोर ठेवून कंपन्यांनी पॉलिसी तयार कराव्यात. 

नवी दिल्ली - भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली ६५ या वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे. त्यामुळे या सुविधेपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  एक एप्रिलपासून सुधारित नियम लागू केले आहेत. अवाजवी उपचारखर्चातून लोकांची सुटका व्हावी, त्यांना आरोग्य सुरक्षा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत आयआरडीएआयने म्हटले आहे की, कंपन्यांनी सर्व वयोगटातील नागरिकांना विमा घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले, महिला, गरोदर माता आदी सर्व घटकांना समोर ठेवून कंपन्यांनी पॉलिसी तयार कराव्यात. 

ईएमआयने पैसे भरू द्यावे पॉलिसी घेताना ईएमआयद्वारे प्रीमियम भरण्याची परवानगी यापुढे ग्राहकांना द्यावी लागणार आहे. प्रीमियमची रक्कम मोठी असल्याने अनेकांना हे पैसे एकरकमी भरणे शक्य होत नव्हते. 

गंभीर आजारामुळे नकार देऊ नका   कॅन्सर, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्स यांसारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी देताना विमा कंपन्या नकार देत असत. परंतु आता यासाठी नकार देण्यास कंपन्यांना मनाई करण्यात आली आहे. 

उपचार खर्चावर मर्यादा नको आयुष उपचार पॉलिसीधारकाच्या कव्हरेजवर कोणतीही मर्यादा घालता येणार नाही. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी आणि होमिओपॅथी यांसारख्या प्रणालीच्या अंतर्गत उपचारांना कोणत्याही मर्यादेशिवाय विमा रकमेचे कव्हरेज मिळेल. लाभ आधारित विमा असलेले पॉलिसीधारक विविध विमा कंपन्यांकडे अधिक दावे दाखल करू शकतात, त्यात लवचिकता वाढवू शकतात, असेही अधिसूचनेत म्हटले आहे. 

टॅग्स :आरोग्य