Join us

लोकसंख्येत अर्ध्या, पण उद्योगांत फक्त ३० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 08:06 IST

महिलांच्या भागीदारीवर फर्ग्युसन यांना चिंता

नवी दिल्ली : उद्योगजगतामधील महिलांचा एकूण वावर पाहिल्यास जागतिक स्तरावर भारत मागे पडल्याचे चित्र दिसत आहे. भारतात ८६ टक्के कंपन्यांच्या संचालक मंडळावर एकही महिला संचालक नाही. जागतिक स्तरावर ८ हजार कंपन्यांमध्ये केवळ ३५ टक्के कंपन्यांमध्ये संचालक मंडळात महिलांना स्थान देण्यात आलेले दिसते, असा खुलासा संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला अधिकारांविषयी कार्यरत असलेल्या सुजन फर्ग्युसन यांनी केला आहे. 

शुक्रवारी असोचेमच्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. महिला सशक्तीकरणाबाबत त्यांनी यावेळी  चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, कंपनी अधिनियम २०१३ नुसार नोंदणीकृत कंपनीच्या संचालक मंडळात किमान एक महिला सदस्य असणे अनिवार्य असते. परंतु कंपन्या याकडे दुर्लक्ष करतात. जगभरातील ८ हजार कंपन्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महिला सक्षमीकरण सिद्धांतावर स्वाक्षरी केली असली तरी अनेक कंपन्यांनी प्रत्यक्षात याचे पालन केलेले नाही. जगभरात महिलांची संख्या निम्म्याइतकी असूनही उद्योग आदी ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण केवळ ३० टक्के इतके आहे. हे प्रमाण एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :महिला