नवी दिल्ली : सरकारने अलीकडेच दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी केल्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे घरगुती बजेटला थोडासा दिलासा मिळणार आहे.
पार्ले प्रॉडक्ट्स, कोलगेट-पामोलिव्ह, ब्रिटानिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, एलजी, वोल्टास, आयटीसी यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी दरकपातीचे संकेत दिले आहेत. या कंपन्यांच्या प्रमुखांनी स्पष्ट केले की, दरकपातीचा लाभ ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहेत.
गेल्या काही महिन्यांत महागाईमुळे वस्तूंची मागणी घटली आहे. जीएसटी कपातीमुळे रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होतील. खरेदीची क्षमता वाढेल. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही विक्रीत सुधारणा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टाटा, महिंद्रा, रेनॉची वाहने झाली स्वस्त
जीएसटी परिषदेने यंदा कार आणि ऑटो कॉम्पोनंटस्वरील करदर कमी केल्यानंतर देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना थेट दिलासा मिळणार आहे.
टाटा मोटर्स ही किमती कमी करण्याची घोषणा करणारी पहिली कंपनी ठरली. कंपनीने प्रवासी वाहनांवर १ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत दरकपात केली असून, नव्या किमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील.
महिंद्रा अँड महिंद्राने प्रवासी वाहन श्रेणीतील दरांमध्ये १ लाख ५६ हजारांपर्यंत दरकपात करण्याची घोषणा केली. या नव्या किमती ६ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. रेनॉ इंडियानेही ग्राहकांसाठी किमती कमी करत आपल्या वाहनांवर ९६ हजारांपर्यंत कपात जाहीर केली आहे.
कुठे होतील भाव कमी?
कपातीचा सर्वाधिक परिणाम अन्नपदार्थ, स्नॅक्स आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर दिसणार आहे. लोणी, चीज, स्नॅक्सवरील कर १२ टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे. चॉकलेट्स, बिस्किट्स, कॉर्न फ्लेक्स, कॉफी, आइस्क्रीम, केसांचे तेल, शाम्पू, साबण, शेव्हिंग क्रीम आणि टूथपेस्ट यांवर आता फक्त पाच टक्के जीएसटी आकारला जाईल.
दरकपातीबद्दल कंपन्यांचे काय म्हणणे?
हिंदुस्तान युनिलिव्हरच्या प्रिया नायर म्हणाल्या, ‘जीएसटी दरकपातीमुळे कररचना सोपी होईल आणि ग्राहकांसाठी वस्तू अधिक सहज उपलब्ध होतील. आम्ही हा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू.’
आयटीसीचे हेमंत मलिक यांनी सांगितले, ‘आम्ही किमती कमी करू किंवा उत्पादनाचे ग्रॅमेज वाढवू. त्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होईल.’
पार्ले प्रॉडक्ट्सचे अरूप चौहान यांनी सांगितले, ‘किमती कमी करून किंवा जास्त ग्रॅमेज देऊन आम्ही हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत. हा बदल भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर ठरेल.’