नवी दिल्ली : देशात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) महसुलामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ई-वे बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदविल्यामुळे हा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील मालवाहतुकीसाठी ई-वे बिल तयार करावे लागते. या बिलांवरून आगामी महिन्यात जीएसटीचा किती महसूल जमा होणार याचा अंदाज येत असतो. मार्च महिन्यामध्ये ४०.६ दशलक्ष ई-वे बिले तयार करण्यात आली. मात्र फेब्रुवारी महिन्यात तयार झालेल्या बिलांपेक्षा ही बिले २८.९ टक्क्यांनी कमी आहेत.एप्रिल महिन्यामध्ये तर ई-वे बिलांच्या संख्येमध्ये मोठीच घट झाली आहे. १ ते २७ एप्रिल या कालावधीमध्ये केवळ ६.७ दशलक्ष ई-वे बिले तयार करण्यात आली आहेत.>कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती. तसेच कारखाने व दुकानेही बंद असल्यामुळे मालवाहतूक कमी झाली. याचा फटका जीएसटीच्या महसुलालाही बसण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चालू महिन्याचा जीएसटी पुढच्या महिन्यातील २० तारखेपर्यंत भरावयाचा असल्याने जीएसटीची एकूण वसुली किती ते पुढील महिन्याच्या अखेरीसच कळणार आहे.
CoronaVirus News: जीएसटीच्या महसुलात होणार घट, एप्रिल, मेबाबतचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 04:18 IST