Delayed GST Return : तुम्हाला जीएसटी रिटर्न भरण्यास उशीर झाला असेल तर काळजी करू नका. कारण, सरकारने विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ म्हणजेच सीबीआयसीने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे यात तब्बल ५ वर्षांसाठी दिलासा देण्यात आला आहे. या अंतर्गत २०१७-१८ ते २०२२-२३ पर्यंत जीएसटीचे वार्षिक रिटर्न किंवा सामंजस्य विवरण विलंब शुल्काशिवाय भरता येणार आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत, त्यांचे वार्षिक परतावे आणि सामंजस्य विवरण विलंब शुल्काशिवाय स्वीकारले जाणार आहेत. आता प्रश्न असा आहे, की ज्यांनी विलंब शुल्कासह जीएसटी भरला आहे, त्यांना रिफंड मिळेल का?
विलंब शुल्क भरले असले तर दिलासा नाहीतुम्ही वार्षिक रिटर्न किंवा विलंब शुल्कासह सामंजस्य विवरण सादर केले असल्यास यात तुम्हाला रिफंड मिळणार नसल्याचे सीबीआयसीने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. जर तुम्हाला विलंब शुल्क माफी हवी असेल तर ३१ मार्च २०२५ पर्यंत जीएसटी परतावा किंवा सामंजस्य विवरण भरावे लागेल. ही ऑफर फक्त ३१ मार्च २०२५ पर्यंतच दिली जाणार असल्याचेही सीबीआयसीने सांगितले.
करदात्यांना दिलासा देणारा निर्णयसीबीआयसीच्या या सूचनेनंतर मोठ्या संख्येने करदात्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विलंब शुल्क माफ केल्याने मोठं ओझं कमी झालं आहे. शिवाय आता जास्तीत जास्त करदाते जीएसटी भरतील असा विश्वास सरकारने व्यक्त केला. टॅक्स भरण्यासाठी करदात्यांना जास्तीत जास्त लवचिकता दिली जाईल, हे सरकराने आधीच सांगितले आहे. अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. जसे की जीएसटी पोर्टल ठप्प होणे. त्यामुळे अनेक करदाते जीएसटी रिटर्न भरू शकले नाहीत. त्यामुळे विलंब शुल्कासह मुदत वाढवली होती. मात्र, आता पूर्णपणे विलंब शुल्क माफ करण्यात आलं आहे