GST Rate Cut Anand Mahindra: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलाय. जीएसटी कौन्सिलनं सरकारच्या सर्व प्रस्तावांना मान्यता देऊन जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल केलाय. आता १२ आणि २८ टक्के जीएसटी दर काढून टाकण्यात आले आहेत आणि फक्त ५ आणि १८ टक्केच कायम ठेवण्यात आलेत. याशिवाय, लक्झरी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी निश्चित करण्यात आलाय. ऑटो सेक्टरलाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही सेगमेंटसाठी जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आलाय. याचं स्वागत करत महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आणखी एक मागणी केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली आहे. आपण आता या लढाईत सहभागी झालो आहोत आणि अधिकाधिक जलद सुधारणा हा वापर आणि गुंतवणूक वाढवण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. या पावलांमुळे अर्थव्यवस्था आणखी विस्तारेल आणि जगात भारताची स्थिती अधिक मजबूत होईल. परंतु आपण स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध वाक्य लक्षात ठेवूया: "उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका." तर, कृपया आणखी सुधारणा करा, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
Mahindra Group नं केलं स्वागत
याशिवाय, महिंद्रा ग्रुपचे ग्रुप सीईओ आणि एमडी डॉ. अनिश शाह यांनी या निर्णयावर निवेदन जारी केलंय. जाहीर केलेली जीएसटी सुधारणा ही भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याचा उद्देश एक सोपी, न्याय्य आणि अधिक समावेशक कर प्रणाली तयार करणं आहे. दोन-दरांच्या रचनेकडे वाटचाल करून आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी संबंधित गरजांवर लक्ष केंद्रित करून. अन्न, आरोग्य, विमा, शेती आणि लघु व्यवसाय - सरकारनं 'इज ऑफ लिव्हिंग' आणि 'इज ऑफ डुइंग बिझनेस' या आपल्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा बळकटी दिली आहे, असं ते म्हणाले.
एसयूव्ही खरेदीदारांसाठी खास संधी
कार सेगमेंटमधील हा बदल मोठ्या सेडान किंवा एसयूव्हीकडे पाहणाऱ्या ग्राहकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल असं मानलं जातंय कारण जीएसटी दर आता २८% आणि सेस १७-२२% ऐवजी ४०% वर स्थिर असेल, ज्यामुळे एक्स-शोरूम किमतींमध्ये प्रभावी कपात होऊ शकते.