जीएसटीमधील १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब संपविण्यात आला असून आता सर्व वस्तू या ५ टक्के आणि १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. या नव्या जीएसटी रचनेची आज घोषणा करण्यात आली असून येत्या २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी रचना लागू होणार आहे.
आज जीएसटी परिषदेची बैठक सुरु होती. पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. आलिशान गाड्या, साखरेचे पेये, फास्ट फूड महागणार आहेत. काही वस्तूंवरील कर हा १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तसेच लक्झरी वस्तूंसाठी ४० टक्के कर लागणार आहे. पान मसाला, गुटखा, दारू इत्यादी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागणार आहे.
वैयक्तिक विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे विमा खरेदी आता स्वस्त झाली आहे. सिमेंटवरील जीएसटी देखील २८% वरून १८% पर्यंत कमी झाला आहे, यामुळे लोकांचे घरांचे स्वप्न स्वस्त झाले आहे. अनेक औषधांवरील जीएसटी शून्यावर आणण्यात आला आहे. छोट्या कार आणि मोटारसायकली (३५० सीसी), टीव्ही आदी गोष्टी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आल्या आहेत.
पिझ्झा,ब्रेड, दूध आणि चीजवर जीएसटी लागणार नाही. २५०० रुपयांपर्यंतच्या शूज आणि कपड्यांवरील जीएसटी दर ५% टक्के करण्यात आला आहे. शाम्पू, साबण, तेल आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या इतर घरगुती वस्तूंव्यतिरिक्त, नमकीन, पास्ता, कॉफी, नूडल्सवर आता 5% GST आकारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. 33 जीवनरक्षक औषधे GST च्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये तीन कर्करोगाच्या औषधांचाही समावेश आहे.