Join us

GST: सरकारसाठी गुड न्यूज! जीएसटी संकलनाचा टक्का वाढला, तिजोरीत किती कोटी झाले जमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 18:25 IST

GST Latest News: जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करांच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसा येतो. २०२४ या वर्षात जीएसटी संकलनात वाढ झाली असून, डिसेंबर महिन्यात तब्बल ७.३ टक्के इतकी वाढ झाली आहे. 

२०२४ या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत लाखो करोड रुपये जीएमटीच्या माध्यमातून जमा झाले. १ जानेवारी रोजी सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये सकल जीएसटी संकलन ७.३ टक्क्यांनी वाढून १.७७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

वस्तू आणि सेवा कर महसूल डिसेंबरमध्ये ७.३ टक्क्यांनी वाढले आहे. १.७७ लाख कोटी जीएसटी सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. गेल्यावर्षी म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये १.६५ लाख कोटी जीएसटीच्या माध्यमातून जमा झाले होते. याच महिन्यात घरगुती व्यवहारातील जीएसटी कर ८.४ टक्क्यांनी वाढला असून, १.३२ लाख कोटींवर गेला आहे. आयातीवरील जीएसटी ४ टक्क्यांनी वाढला असून, ४४,२६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

२२ हजार कोटी परतावा

डिसेंबर २०२४ मध्ये २२,४९० कोटी रुपये परतावा जारी करण्यात आला आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या (२०२३) तुलनेत ३१ टक्के जास्त आहे. नोव्हेंबरमध्ये (२०२४) जीएसटी कलेक्शन ८.५ टक्के वार्षिक वाढीसह १.८२ लाख कोटी रुपये राहिले. आतापर्यंतचे सर्वात जास्त जीएसटी संकलन एप्रिल २०२४ मध्ये २.१० लाख कोटी झाले होते.

ऑक्टोबर २०२४ मध्ये १.८७ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. ९ टक्क्यांसह वर्षातील ही दुसऱ्या क्रमांकावरील संकलन होते. 

२०१७ मध्ये लागू करण्यात आला जीएसटी

जुनी अप्रत्यक्ष कर व्यवस्था बदलून जीएसटी लागू करण्यात आला. २०१७ मध्ये लागू करण्यात आलेला जीएसटी कायदा हा आतापर्यंतचा सर्वात कर सुधारणा कायदा म्हटला गेला. 

टॅग्स :जीएसटीनिर्मला सीतारामनकेंद्र सरकारकर