Join us

फक्त १६००० रुपये कमावणाऱ्याला GST विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची नोटीस; तपासानंतर समोर आला नवा घोटाळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:18 IST

अहमदाबादमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या दुदखा गावातील एका तरुणाला बंगळुरू जीएसटी विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांत आधार कार्डचा गैरवापर करून सायबर फसवणुकीद्वारे  बँक खाती उघडण्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. मात्र, गुजरातमधील पाटण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या दुदखा गावातील एका तरुणाला बंगळुरू जीएसटी विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाली आहे. त्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी महिन्याला फक्त १६ हजार रुपये कमवणाऱ्या या तरुणासाठी हा मोठा धक्का बसला आहे.

सुनील सथवारा असे या तरुणाचे नाव आहे. सुनील सथवारा हा एक साधा मेकॅनिक आहे, जो छोटी-मोठी कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान, बंगळुरू येथील जीएसटी विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाल्यावर सुनील सथवाराला धक्का बसला. या नोटीसबाबत त्याने वकिलाशी संपर्क साधला. त्यानंतर वकिलाने ऑनलाइन जीएसटी क्रमांक तपासला. त्यावेळी असे आढळून आले की, सुनील सथवाराच्या नावाने ११ कंपन्या कार्यरत आहेत, ज्या देशातील विविध राज्यात आहेत.

या कंपन्या उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि अंदमान निकोबार यासारख्या राज्यांमध्ये कार्यरत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान, सुनील सथवाराच्या नावाने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सुनील सथवाराच्या नावाने इतक्या कंपन्या कशा आणि कोणी निर्माण केल्या? या कंपन्या प्रत्यक्षात चालू आहेत की फक्त नावापुरत्या अस्तित्वात आहेत, हा तपासाचा विषय आहे. 

या प्रकरणी सुनील सथवारा आणि त्याच्या कुटुंबीयांनी गृह विभाग आणि गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. आपल्या कागदपत्रांचा वापर बनावट पद्धतीने करण्यात आल्याचे सुनील सथवाराचे म्हणणे आहे. तर या प्रकरणाचा तपास आता गांधीनगर सीआयडी क्राईम करत आहे. ज्या व्यक्तीने या ११ कंपन्या स्थापन केल्या आहेत, त्या व्यक्तीचे खरे नाव काय आहे, तो कुठे राहतो आणि या संपूर्ण रॅकेटमागील खरा हेतू काय आहे, हे सर्व तपासानंतरच स्पष्ट होईल.

टॅग्स :जीएसटीधोकेबाजीसायबर क्राइम