Join us

जीएसटी, कंपनी कायद्यामुळे लेखापरीक्षकांना ‘अच्छे दिन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 04:02 IST

आयसीएआय’चा अहवाल : आंतरराष्ट्रीय नियुक्त्या; वार्षिक वेतन ३६ लाखांवर

चेन्नई : वस्तू व सेवाकर (जीएसटी) तसेच कंपनी कायदा यामुळे नियामकीय छाननी, तसेच प्रशासकीय गुणवत्ता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून लेखापरीक्षकांना असलेली (सीए) मागणी वाढली आहे. सीएंची मागणी सध्या सार्वकालिक उच्चांकावर असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडियाने (आयसीएआय) जारी केलेल्या नियुक्त्यांविषयक आकडेवारीतून दिसून येते. सीएंच्या वेतनातही वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय नियुक्त्यांसाठीचे (जॉब पोस्टिंग्ज) वार्षिक वेतन दुपटीने वाढून ३६ लाख रुपये झाले आहे.

२०१९ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये आयसीएआयच्या नियुक्ती आवर्तनात (प्लेसमेंट सायकल) सहभागी झालेल्या ६,६४६ पात्र सीएंपैकी ३,८१५ सीएंना रोजगार प्रस्ताव मिळाले आहेत. गेल्या वर्षी याच अवधीत केवळ १,४७३ रोजगार प्रस्ताव मिळाले होते. आयसीएआयच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून सीएंना नोकरीवर घेणाऱ्या कंपन्यांत अक्सेंचर, अलस्टोम, बार्कलेज ग्लोबल सर्व्हिसेस, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, आयटीसीआणि एएनआय टेक्नॉलॉजीज (ओला) यांचा समावेश आहे. बँकिंग क्षेत्रांकडूनही सीएंना जबरदस्त मागणी आहे.

आयसीएआयचे अध्यक्ष प्रफुल्ल पी. छाजेड यांनी सांगितले की, ताज्या प्लेसमेंट उपक्रमास रोजगारदात्यांकडून आतापर्यंतचा सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संस्थेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नियुक्त्यांचे प्रस्ताव मिळाले आहेत.सीआईएल एचआर सर्व्हिसेसचे संचालक तथा सीईओ आदित्य नारायण मिश्रा यांनी सांगितले की, जीएसटीसारख्या सुधारणांमुळे आर्थिक आकडेमोड वाढली आहे. कंपनी कायद्यातील सुधारणांमुळे अनुपालनात सुसूत्रता आली आहे. त्यामुळे कंपन्या व संस्थांना अधिकाधिक सीएंची गरज भासत आहे. त्यातून सीएंना असलेली मागणी साहजिकपणेच वाढली आहे. रोजगार प्रस्ताव स्वीकारणाऱ्या३,१८० सीएंपैकी ७३० जणांना वार्षिक ९ लाखांचे वेतन पॅकेज मिळाले आहे. ५५ टक्के सीएंना ७.५ ते ९ लाख यादरम्यान पॅकेज मिळाले आहे. सरासरी वेतन पॅकेज ७.४३ लाख रुपये राहिले.

टॅग्स :जीएसटी