नवी दिल्ली : भारताच्या सेवा क्षेत्रातील घडामोडी नोव्हेंबरमध्ये किंचित घसरल्या आहेत. या क्षेत्रातील रोजगारांच्या संधी मात्र २००५ नंतर सर्वाधिक गतीने वाढल्याचे दिसून आले आहे.
एचएसबीसी इंडियाने जारी केलेला सेवा क्षेत्राचा विक्री व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) नोव्हेंबरमध्ये अल्पप्रमाणात घसरून ५८.४ अंकांवर आला. ऑक्टोबरमध्ये तो ५८.५ अंकांवर होता. ज्ञात असावे की, ५० अंकांच्या वरील पीएमआय वाढ, तर ५० अंकांच्या आतील पीएमआय घसरण दर्शवितो.
एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ (भारत) प्रांजुल भंडारी यांनी सांगितले की, सेवा क्षेत्रातील आर्थिक घडामोडी किंचित घसरल्या असल्या तरी नोव्हेंबरमध्ये रोजगार २००५ नंतर सर्वाधिक गतीने वाढला. उद्योजकांचा आत्मविश्वास वाढल्याचे तसेच नवीन ऑर्डर वाढल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय मागणीत सुधारणा झाल्याचे संकेत मिळत आहेत. नवीन ऑर्डर ३ महिन्यांत सर्वाधिक तेजीने वाढल्या आहेत. मात्र ही वाढ या वर्षाच्या मध्यात झालेल्या वाढीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
महागाईमुळे दबाव
भंडारी यांनी सांगितले की, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि श्रम खर्चातील वृद्धी यामुळे महागाईवरील दबाव वाढला आहे. खर्च व आउटपुट शुल्क यातील वाढ अनुक्रमे १५ महिने आणि १२ वर्षांच्या उच्चांकावर राहिली.