Join us
Daily Top 2Weekly Top 5

चीनचे मोठे यश, हाती लागला खजिना; अनेक दशकांपासून सुरू होता याचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 18:15 IST

यामुळे चीनचे नशीब पालटणार आहे.

China Crude Oil: भारताचा शेजारील देश चीन जगातील सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. चीन त्यांच्या कच्च्या तेलाच्या वापराच्या 70% पेक्षा जास्त आयात करतो. यातच आता चीनच्या हाती मोठा खजिना लागला आहे. हेनान प्रांतात 107 मिलियन टन कच्च्या तेलाचे साठे सापडले आहेत. हे 2023 मध्ये चीनच्या एकूण तेल उत्पादनाच्या निम्म्याहून अधिक आहे. जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या खरेदीदारासाठी तेलाचे साठे सापडणे म्हणजे लॉटरी जिंकण्यासारखे आहे.

चीनी मीडियानुसार, हेनान प्रांतातील सॅनमेन्क्सिया बेसिनमध्ये ड्रिलिंग करण्यात आले, त्यादरम्यान तिथे हे तेलाचे साठे सापडले आहेत. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या अखत्यारीतील चायना जिओलॉजिकल सर्व्हेने याबाबत माहिती दिली.

तेल खरेदीवर होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने चीनने देशातील विविध ठिकाणी तेलसाठ्यांचा शोध सुरू केला होता. चीन सरकारचे मुखपत्र सीसीटीव्हीने म्हटले आहे की, 'गेल्या 50 वर्षांपासून या भागात तेल आणि नैसर्गिक वायुंचा शोध सुरू होता. आता हे तेलाच्या साठ्यांचा शोध मैलाचा दगड ठरणार आहे.' 

चीन सर्वात मोठा आयातदार चीन मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाचे उत्पादन करतो, परंतु देशात नैसर्गिक संसाधनांची मागणी खूप जास्त आहे. चीन आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 70% पेक्षा जास्त आयात करतो आणि गेल्या वर्षी त्यांनी 566 मिलियन टन कच्चे तेल आयात केले होते. तर, 2022 मध्ये ही आयात 508 मिलियन टन होती. 

पूर्वी चीन सौदी अरेबियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करत असेस परंतु आता रशियाने सौदी अरेबियाची जागा घेतली आहे. कस्टम डेटानुसार, गेल्या वर्षी चीनच्या एकूण कच्च्या तेलाच्या खरेदीत रशियाचा वाटा 19% होता, तर सौदीचा वाटा 15% होता. चीनला तेल विकणाऱ्या टॉप-10 देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. गेल्या वर्षी चीनने आपल्या कच्च्या तेलाच्या वापराच्या 2.5% खरेदी अमेरिकेकडून केली.

 

टॅग्स :चीनखनिज तेलरशियाअमेरिकाव्यवसायगुंतवणूकपेट्रोलडिझेल