Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांना नोकरी मिळेना! बेरोजगारीचे प्रमाण तब्बल ४२ टक्के; कुणाला मिळतोय जॉब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 06:53 IST

निरक्षर, दहावी शिकलेल्यांना संधी. देशात कर्मचाऱ्यांची मागणी कमी होत असून, त्यांचा बोजा सतत ऑफिसमधील सध्याच्या कर्मचाऱ्यांवर टाकला जात आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर भारतात बेरोजगारीत काही प्रमाणात घट झाली असली तरीही कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडलेले आणि २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया २०२३च्या अहवालानुसार देशात तरुण पदवीधरांच्या बेरोजगारीचा दर ४२.३ टक्क्यांच्या उच्च स्तरावर आहे, तर कमी शिकलेल्या लोकांचा बेरोजगारी दर ८ टक्के आहे.

भारतात बेरोजगारीचा दर वर्ष २०१९-२० मध्ये ८.८ टक्क्यांवर होता. तो २०२१ मध्ये ७.५ टक्के आणि २०२२ मध्ये ६.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र असे असले तरी तरुण पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर प्रचंड आहे. दुसरा सर्वात मोठा बेरोजगार गट हा २५ ते ३० वर्ष वयोगटातील पदवीधर किंवा उच्च पात्रता असलेला आहे. तो २२.८ टक्के इतका आहे. यानंतर उच्च माध्यमिक स्तरावरील पात्रता असलेल्या आणि २५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारी दर २१.४ टक्के आहे.

नोकरी लागली तरी कमाई होईनादेशात काही प्रमाणात बेरोजगारी कमी होत असली तरीही लोकांची कमाई वाढत नाही. ती स्थिर आहे. कमी बेरोजगारी आणि कमाई स्थिर असल्याने काम करणाऱ्या लोकांची मागणी अधिक नसल्याचे संकेत मिळत आहेत.

बोजा कुणावर? देशात कर्मचाऱ्यांची मागणी कमी होत असून, त्यांचा बोजा सतत ऑफिसमधील सध्याच्या कर्मचाऱ्यांवर टाकला जात आहे. २०२१-२२ मध्ये एकूण घरगुती उत्पन्नात १.७ टक्के वाढ होत आहे.

शहरांत-गावांत काय स्थिती? शहरी भागात राहणाऱ्या महिलांमध्ये ९.९ टक्क्यांसह उच्चांकी स्तरातील बेरोजगारी आहे. शहरी भागात बेरोजगारी दर ७.८ टक्के आणि ग्रामीण भागात ६.५ टक्के आहे. २०२२ मध्ये ग्रामीण भागात महिलांमधील बेरोजगारी दर ४.५ टक्के आहे. ५ वर्षांमध्ये ग्रामीण भागात महिलांना अधिक नोकरी मिळत आहे.

नेमकी कुणाला मिळतेय नोकरी? पदवीधर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असले तरी ज्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांच्यामध्ये बेरोजगारीचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. अहवालानुसार, पदवीधरांना सरासरी वर्षादरम्यान किंवा ३० ते ४० वर्षांच्या सुरुवातीला नोकरी लागत आहे. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :बेरोजगारी