Join us  

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कांदा निर्यातीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 2:20 PM

कांद्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये रोष

नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या वाढत्या दरामुळे देशातील ग्राहकांमध्ये रोष निर्माण होत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. 

कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारडून निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये झालेला पावसामुळे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. यामुळे कांद्याचा पुरवठा विस्कळीत झाला आणि दरात वाढ झाली. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत होते.

मात्र, तरीही गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरांनी अचानक उसळी घेतली. राजधानी दिल्ली आणि देशातील इतर ठिकाणी कांद्याचे दर प्रतिकिलो 70 ते 80 रुपयांवर पोहोचले. त्यामुळे कांद्याच्या वाढत्या दरामुळे हवालदिल झालेल्या केंद्र सरकारने अखेर कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. 

टॅग्स :कांदाव्यवसाय