Join us  

छोट्या व्यापाऱ्यांना सरकारचा दिलासा, दर तीन महिन्यांनी जीएसटी रिटर्न दाखल करण्याची सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 7:14 PM

वाढत्या महागाईमुळे केंद्रातील मोदी सरकार चौफेर टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.

मुंबई - वाढत्या महागाईमुळे केंद्रातील मोदी सरकार चौफेर टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयानुसार दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांनी  दर तीन महिन्यांनी जीएसटी रिटर्न दाखल करण्याची तीन महिन्यांचा अवधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 50 हजार रुपयांवरील  खरेदी खरेदीसाठी पॅनकार्ड असणे अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता 2 लाख रुपयांवरील  खरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक असेल. त्याबरोबरच रत्न आणि दागिन्यांबाबतचे जुने नोटिफिकेशन मागे घेऊन सुधारित नोटिफिकेशन काढण्याचा निर्णय घेण्यात आला.  याआधी व्यापाऱ्यांनी दर महिन्याला जीएसटी रिटर्न दाखल करावे लागत होते. मात्र जीएसटी कौन्सिलने आज घेतलेल्या निर्णयानुसार दीड कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना दरमहा जीएसटी रिटर्न दाखल करण्याऐवजी दर तीन महिन्यांनी जीएसटी रिटर्न दाखल करण्याची सवलत देण्यात आली आहे. 

जीएसटीच्या अंमलबजावणीत येत असलेल्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी बनवण्यात आलेल्या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमुख सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले की, कम्पाउंडिंग स्कीमनुसार 75 लाख उलाढालीची मर्यादा वाढवून 1 कोटी करण्यात आली आहे. असे व्यावसायिक 3 महिन्यांच्या एकूण विक्रीच्या एक टक्का कर जमा करून विवरणपत्र दाखल करू शकतील. कम्पाउंडिंग डीलरांच्या दुसऱ्या राज्यात माल विक्री करण्याचा अधिकार आणि इनपूट सब्जिडीचा लाभ देण्यासाठी 5 सदस्यीय मंत्रिगटाचे गठन करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच रिव्हर्स चार्जला पुढील वर्षीच्या 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.  

जीएसटीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला सगळीकडूनच टीकेचा धनी व्हावे लागत आहे. पण आता मोदी सरकारच्या जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे जागतिक बँकेने समर्थन केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक आहे. जीएसटी लागू केल्यामुळे दिसणारे हे तात्पुरते परिणाम आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये ही संपूर्ण मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल, असं जागतिक बँकेने म्हटले आहे. जीएसटी लागू केल्याने भारतात अनेक सकारात्मक बदल होतील, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी म्हटले आहे. जीएसटी लागू केल्यानंतरच्या पहिल्या तीन महिन्यात अर्थव्यवस्थे घसरण झाल्याचं पाहायला मिळाले. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका, येत्या काळात हा आलेख नक्कीच उंचावेल, असा विश्वास जिम योंग किम यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :जीएसटीसरकारभारत