Join us

सरकारी डाळी, तांदूळ अन् गव्हाचे पीठ महागले; ‘भारत ब्रँड’च्या जिन्नसांचे दर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:16 IST

दर स्थिर राखण्याचे सरकारचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सर्वसामान्यांची महागाईने होरपळ होत असल्याने सरकारने अनुदान देऊन काही जिन्नसांची विक्री ‘भारत ब्रँड’अंतर्गत सुरू केली होती. पण, हा दिलासाही ऐन दिवाळीच्या तोंडावर संपणार आहे. याअंतर्गत विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचे भाव बुधवारपासून वाढवले आहेत. योजनेत अख्खा हरभरा आणि मसूरडाळीचा समावेश केला आहे. अख्खा हरभरा ५८ रुपये प्रतिकिलो तर मसूरडाळ ८९ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाईल.

गव्हाच्या पिठाचे दर ९.०९ टक्के तर तांदळाचे दर १७.२४ टक्के वाढवले आहेत. गव्हाच्या पिठाचे दर प्रतिकिलो २७ वरून वाढवून ३० रुपये तर तांदळाची किंमत प्रतिकिलो २९ वरून ३४ रुपये इतकी करण्यात आली आहे. चण्याची डाळही आता प्रतिकिलो ६५ ऐवजी ७० रुपयांत मिळणार आहे.

दर स्थिर राखण्याचे सरकारचे प्रयत्न

अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी सांगितले की, नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ) आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) यांच्या वतीने ५८ रुपये प्रतिकिलो दराने हरभरा तर ८९ रुपये प्रतिकिलो दराने मसूरडाळ विकली जाईल. काही उत्पादनांचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी भांडारातील धान्य अनुदानित किमतीने विकले जात आहे. सरकारने सहकारी संस्थांना यासाठी तीन लाख टन हरभरा आणि ६८ हजार टन मूग उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :महागाईअन्न