Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्याचा विमा घेतला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 14:35 IST

Policy: जेव्हा तुम्ही आरोग्य पॉलिसी घेता तेव्हा त्यात मानसिक आरोग्य कवच आहे की नाही ते नक्की तपासा. गेल्या काही वर्षांत मानसिक आरोग्याची समस्या वाढल्या आहेत.

- चंद्रकांत दडस, उपसंपादकजेव्हा तुम्ही आरोग्य पॉलिसी घेता तेव्हा त्यात मानसिक आरोग्य कवच आहे की नाही ते नक्की तपासा. गेल्या काही वर्षांत मानसिक आरोग्याची समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यासह असलेली सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी घ्या. ही पॉलिसी घेण्याचा खर्च थोडा जास्त असेल, पण आगामी काळात आर्थिक भार यामुळे कमी होईल.

का आहे गरज? कोरोना महामारी आल्यानंतर लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. एका अहवालानुसार, भारतात मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त लोक मोठ्या संख्येने आहेत. जगाच्या तुलनेत हे प्रमाण १५ टक्के इतके अधिक आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यातील समस्यांवर उपचार घेणे काळाची गरज बनली आहे.कायदा कधी आला? विमा कंपन्या मानसिक आरोग्य संरक्षण टाळण्याच्या मन:स्थितीत असतात, परंतु अलीकडेच विमा नियामक इर्डाने खासगी विमा कंपन्यांना विम्यात मानसिक आरोग्यदेखील कव्हर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात पाच वर्षांपूर्वी कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे हेल्थ पॉलिसी घेताना मानसिक आरोग्याचा विमा आहे का, हे तपासून घ्या.नेमके काय होईल? शारीरिक आरोग्याप्रमाणेच आता मानसिक आजारी असण्यामुळेही मोठा खर्च येतो. तसेच हा आजार बरा होण्यासाठी जास्त वेळ लागतो. आरोग्य विमा घेतल्यास खर्च कमी होईल. म्हणून, जेव्हाही तुम्ही हेल्थ पॉलिसी घ्याल तेव्हा लक्षात ठेवा, फक्त सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी घ्या.काय असते सुविधा? सर्वसमावेशक आरोग्य विमा घेताना, तपासणी करून घेण्याची सुविधा उपलब्ध असते, यामुळे आजाराच्या पहिल्या टप्प्यात निदान करण्यास सोपे जाते. हा विमा प्रतिबंधात्मक चाचण्या करून घेण्याची सुविधा देतो. त्यामुळे भविष्यात आर्थिक बोजाही कमी होईल.

टॅग्स :गुंतवणूक