Join us  

गुगल+ला डाटा चोरीचा जबर फटका; ५२.५ दशलक्ष खात्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 2:03 AM

नियोजित वेळेपूर्वीच सेवा बंद करणार, व्यावसायिकांचाही समावेश

सॅन फ्रान्सिस्को : गुगलच्यागुगल+ सेवेला यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा डाटा चोरीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही सेवा येत्या एप्रिलमध्ये म्हणजेच नियोजित वेळापत्रकाच्या चार महिने आधीच बंद केली जाणार आहे. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली.याबाबत कंपनीने सविस्तर निवेदन जारी केले आहे. त्यात गुगलने म्हटले की, गुगल+ सेवेच्या भागीदार अ‍ॅप्सनी वापरकर्त्यांचा डाटा पळविल्याचे आढळून आले आहे. इतर अ‍ॅप्सनी डाटा चोरल्याचा कोणताही पुरावा दिसून आलेला नाही. या डाटाचोरीत वापरकर्त्याचे नाव, ई-मेल, लिंग आणि वय ही माहिती फुटली आहे. ताज्या बगचा ५२.५ दशलक्ष गुगल+ खात्यांना फटका बसला आहे. त्यात काही व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे.या प्रकरणावरून अमेरिकेत मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे अमेरिकी काँग्रेस सभागृहाच्या न्यायालयीन समितीच्या बैठकीसमोर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची गुगलच्या डाटा संकलनाच्या पद्धतीबाबत साक्ष होणार आहे. या साक्षीच्या काही दिवस आधीच गुगलला डाटाफुटीचा फटका बसला आहे. गुगल, फेसबुक व अन्य मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक नियम असावेत, अशी मागणी अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांच्या खासदारांनी केली आहे. दडलेल्या बगमुळे डाटा फुटल्याचा संशयगुगल+ ही सेवा आॅगस्ट २0१९ मध्ये बंद करण्यात येणार असल्याचे गुगलने गेल्या आॅक्टोबरमध्ये जाहीर केले होते. ही सेवा लोकप्रिय नसल्याने ती सुरू ठेवणे, तसेच तिची देखभाल करणे कंपनीसाठी आव्हानात्मक ठरले आहे.गुगल+मध्ये एक बग दोन वर्षांपासून दडून बसलेला असून, त्यामुळे ५ लाख खात्यांचा प्रोफाईल डाटा भागीदार अ‍ॅप्सला प्राप्त झाला असावा, असा संशयही गुगलने आॅक्टोबरमध्ये व्यक्त केला होता.

टॅग्स :गुगल