Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेट-टॉप बॉक्सला कायमचा रामराम! आता टीव्हीवर मोफत दिसणार 'हे' चॅनल्स; केंद्र सरकारची मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:26 IST

लोकांचा टीव्ही पाहण्याचा अनुभव बदलणार असून केंद्र सरकारने आता सेट-टॉप बॉक्सला सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

DD Free Dish upgrades: देशातील टीव्ही प्रेक्षकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता दूरदर्शनचे डीडी फ्री डिश चॅनेल्स पाहण्यासाठी कोणत्याही वेगळ्या सेट-टॉप बॉक्सची गरज भासणार नाही. माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इन-बिल्ट सॅटेलाईट ट्यूनर आणि स्मार्ट इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड असलेले नवीन टीव्ही सादर केले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या उपक्रमाचा शुभारंभ करत तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणावर भर दिला.

काय आहे नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा फायदा?

आतापर्यंत फ्री डिश पाहण्यासाठी टीव्हीसोबत एक स्वतंत्र सेट-टॉप बॉक्स लावावा लागत असे. मात्र, नवीन तंत्रज्ञानामुळे, टीव्हीमध्येच सॅटेलाईट ट्यूनर बसवलेले असेल, ज्यामुळे सॅटेलाईटचे सिग्नल थेट टीव्ही पकडू शकेल. ग्राहकांना वेगळा सेट-टॉप बॉक्स खरेदी करण्याचा खर्च करावा लागणार नाही. अतिरिक्त केबल्स आणि दोन-दोन रिमोट वापरण्याची कटकट आता कायमची मिटणार आहे. यामध्ये एक प्रगत इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड असेल, ज्याद्वारे युजर्स चॅनेल्स आणि कार्यक्रमांचे वेळापत्रक सहजपणे पाहू शकतील.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार तंत्रज्ञान स्वस्त आणि सर्वांच्या आवाक्यात आणण्याचा हा प्रयत्न आहे. आता हाय-क्वालिटी मनोरंजन थेट प्रत्येक घरात पोहोचेल आणि त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त उपकरणाची गरज भासणार नाही," असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं.

टीव्ही तंत्रज्ञानासोबतच सरकारने देशातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला चालना देण्यासाठी नॅशनल एआय स्किलिंग इनिशिएटिव्ह सुरू केले आहे. हा उपक्रम गुगल आणि यूट्यूब यांच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. मीडिया, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग क्षेत्रातील सुमारे १५,००० तरुण आणि व्यावसायिकांना विनामूल्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन मॉड्युल्सद्वारे मूलभूत शिक्षण दिले जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात प्रगत आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.

सामान्य नागरिकांसाठी संधी

अश्विनी वैष्णव यांनी यावेळी 'MyWAVES' हे सिटीझन क्रिएटर प्लॅटफॉर्म देखील लाँच केले. हे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एक विशेष फिचर असेल, जिथे सामान्य नागरिक आपली कला, पर्यटन, हस्तकला आणि प्रादेशिक कथा जगासमोर मांडू शकतील. क्रिएट इन इंडिया या मोहिमेअंतर्गत भारतीय संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Goodbye Set-Top Box! Free TV Channels with Government's New Initiative.

Web Summary : The government introduces TVs with built-in satellite tuners, eliminating the need for set-top boxes. This initiative lowers costs, simplifies viewing, and promotes creative economy through AI skilling and a citizen creator platform.
टॅग्स :अश्विनी वैष्णव