Gold Silver Price 7 April: शेअर बाजारात ट्रम्प यांच्या टॅरिफच्या भूकंपानंतर आता सराफा बाजारातही याचे परिणाम दिसत आहेत. सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. लग्नसमारंभासाठी सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारच्या बंदच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव २६१३ रुपयांनी कमी होऊन ८८४०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदी ४५३५ रुपयांनी घसरून ८८,३७५ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.
आयबीजेएने जारी केलेल्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव आता २६०३ रुपयांनी कमी होऊन ८८,०४७ रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २३९४ रुपयांनी कमी झाला आहे. तर दुसरीकडे आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १९६० रुपयांनी कमी होऊन ६६,३०१ रुपये झाला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे हे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
या महिन्यात सोनं झालं स्वस्त
एप्रिलमध्ये आतापर्यंत सोनं २६१३ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरात १२,५५९ रुपयांची घसरण झाली आहे. २०२५ बद्दल बोलायचं झालं तर सोनं १२,६६१ रुपये आणि चांदी २३५८ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.