Join us

EPFO च्या ७ कोटी खातेदारांना मिळणार गुड न्यूज; २०२४-२५ साठी पीएफवरील व्याजदर होणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:00 IST

EPFO News Update : तुम्ही जर ईपीएफचे सदस्य असाल तर तुमच्यासाठी हा आठवडा खास असणार आहे. कारण, या आठवड्यात EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे.

EPF Rate Hike : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सुमारे ७ कोटी खातेदारांसाठी हा आठवडा खूप खास असणार आहे. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी म्हणजेच या आठवड्यात शुक्रवारी होऊ शकते. या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF च्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. २०२३-२४ या आर्थिक वर्षातही ईपीएफवर ८.२५ टक्के व्याज देण्यात आले होते.

केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफवरील व्याजदराबाबत निर्णय घेतला जाईल. सीबीटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. EPF खातेधारकांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी 8.25 टक्के, २०२२-२३ मध्ये ८.१५ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ८.१० टक्के व्याज देण्यात आले. चालू आर्थिक वर्षात ईपीएफओ​​ला त्याच्या गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळत असल्याने यावर्षी देखील ईपीएफओ ​​खातेधारकांना ८.२५ टक्के व्याज दिले जाण्याची शक्यता आहे.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजनाईपीएफओ योजना ही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना मानली जाते. प्रत्येक महिन्याला खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफच्या नावावर एक निश्चित भाग कापला जातो आणि नियोक्त्याच्या वतीने तेवढेच योगदान पीएफमध्ये दिले जाते. नोकरी गमावणे, बांधकाम किंवा घर खरेदी, लग्न, मुलांचे शिक्षण किंवा सेवानिवृत्ती अशा परिस्थितीत कर्मचारी पीएफचे पैसे काढू शकतात.

केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत EPFO ​​खातेधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा देण्यासाठी व्याज स्थिरीकरण राखीव निधीच्या निर्मितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.  ७ कोटी EPFO ​​खातेधारकांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर स्थिर परतावा मिळावा हा या निधीची निर्मिती करण्याचा उद्देश आहे. यासह, व्याजदरात चढ-उतार होत असताना किंवा EPFO ​​ला त्याच्या गुंतवणुकीवर कमी परतावा मिळत असतानाही खातेधारकांना निश्चित परतावा दिला जाऊ शकतो. जर या योजनेला EPFO ​​च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने मान्यता दिली तर ती २०२६-२७ पासून लागू केली जाऊ शकते. केंद्रीय विश्वस्त मंडळामध्ये कामगार आणि रोजगार मंत्र्याव्यतिरिक्त कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होतो.

टॅग्स :कामगारगुंतवणूक