Join us  

भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 5:34 AM

डीआरआय, सीमा शुल्क विभागातर्फे विमानतळ, बंदरे तसेच जिथे सोन्याची किंवा अमली पदार्थांची किंवा अन्य गोष्टींची तस्करी होते तिथे विशेष पाळत ठेवली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सोने तस्करीच्या घटनांत तब्बल ७४ टक्के वाढ झाल्याची माहिती आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात ५०० किलोपेक्षा जास्त सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केल्याची माहिती आहे. डीआरआय, सीमा शुल्क विभागातर्फे विमानतळ, बंदरे तसेच जिथे सोन्याची किंवा अमली पदार्थांची किंवा अन्य गोष्टींची तस्करी होते तिथे विशेष पाळत ठेवली जाते. या दोन्ही विभागांपैकी डीआरआयने ५०० किलो  सोने पकडले आहे. तर सीमा शुल्क विभागाची आकडेवारी अद्याप उपलब्ध व्हायची आहे.

प्राप्त माहितीनुसार, देशभरात पाचशे पेक्षा जास्त सोने तस्करीच्या प्रकरणी तपास यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत. दुबई, आबुधाबी, बँकॉक, मस्कत, जेद्दा, सिंगापूर येथून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, दिल्ली या विमानतळावर तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्यामुळे अनेक तस्करांनी परदेशातून भारतीय छोट्या विमानतळांकडे जाणाऱ्या विमानातून सोने तस्करी करण्याचा देखील प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे. सोन्याच्या आयात शुल्कातील वाढ आणि भारतात सोन्याच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सोने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत.

‘ते’ कारखाने केले उद्ध्वस्त

केवळ सोन्याचे दागिने, बिस्किटे, बारच नव्हे तर सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर यावर प्रक्रिया करत त्यातून सोने घडवत त्यांची विक्री भारतामध्ये होत आहे. हे प्रक्रिया करणारे कारखाने देखील डीआरआयने उद्ध्वस्त केले आहेत.

टॅग्स :सोनंतस्करी