Join us  

Gold Rates: खूशखबर! सोन्याचे दर घसरले; तब्बल आठ महिन्यांनी गाठला नीचांक, जाणून घ्या आजचा दर

By मुकेश चव्हाण | Published: February 17, 2021 3:48 PM

Todays Gold Rates: बदलत्या घडामोडींमुळे सोनं आणि चांदीच्या भावांमध्ये वारंवार चढ-उतार पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली: बदलत्या घडामोडींमुळे सोनं आणि चांदीच्या भावांमध्ये वारंवार चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण आज बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाल्याचं समोर आलं आहे. आज सोन्याचे दर १११ रुपयांनी घसरले आहेत. दहा ग्राम सोन ४६ हजार ७८८ या दराने आज विकलं जात आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज मागील आठ महिन्यांमधील नीचांक पातळीवर सोन्याचे दर पोहचले आहेत.

आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा दर ६९ हजार ५०७ रुपये प्रति किलो इतका होता. आज दहा ग्राम सोन ४६ हजार ७८८ या दराने विकलं जात आहे. तर दुसरीकडे चांदीची किंमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. चांदीची किंमत १३५ रुपयांनी वाढली आहे. 

सोन्याचा दर ५० हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर ७० हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोन्याच्या किंमतीत आणखी घट होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली होती. मात्र, त्यांनी सोने-चांदीवर अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावणार असल्याचंदेखील सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एकीकडे कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली, तर दुसरीकडे सोन्यावर अडीच टक्क्याचा सेस लावणार असल्याचं सांगितल्याने नागरिकांची निराशाच झाली.

सोन्यावर आधी साडेबारा टक्के कस्टम ड्युटी होती. ती आता साडेसात टक्क्यांपर्यंत आणली आहे. पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. पण दुसरीकडे सरकारने अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावलेला आहे. जी पूर्वी साडेबारा टक्के ड्युटी होती ती आता साडेसात अधिक अडीच म्हणजे दहा टक्के कर हा लागणारच आहे. त्यामुळे अडीच टक्क्याचा निश्चित फायदा हा सोनारांना होईल. किंवा सोनं स्वस्त होईल. आता तो फायदा सोनार ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, अशी माहिती अर्थतज्ज्ञ निखिलेश सोमण यांनी सांगितली आहे.

कसा ठरतो सोन्याचा भाव?

कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात  मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात  ठरवण्यात आला.

आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना अशी नावे आहेत. सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.

टॅग्स :सोनंभारतव्यवसायनिर्देशांक