Join us  

Gold Rate: सुवर्ण बाजारात उलटफेर; डॉलर घसरताच वधारतेय सोने-चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 4:54 AM

Gold Rate: सोने ३०० रुपयांनी महागले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील डॉलरच्या दराचा होणारा परिणाम यावेळी सुवर्णबाजारावर उलट होताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुवर्ण बाजारात उलट चित्र दिसत असून, अमेरिकन डॉलरचे दर वाढल्याने सोने-चांदी स्वस्त होत आहे, तर डॉलर घसरल्यास सोने-चांदी दरात वाढ होत आहे. अशाच प्रकारे बुधवारीदेखील डॉलर घसरला असताना चांदीच्या भावात दोन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती पुन्हा ७० हजारांवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ५०० रुपयांवर पोहोचले.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील डॉलरच्या दराचा होणारा परिणाम यावेळी सुवर्णबाजारावर उलट होताना दिसत आहे. एरवी डॉलरचे दर वधारल्यास सोने-चांदी महाग होते. मात्र गेल्या आठवड्यापासून यात उलटफेर होत आहे. सट्टाबाजारातील खेळीमुळे अस्थिरता निर्माण झाली असल्याचे दररोज चित्र आहे. गेल्या आठवड्यात २२ फेब्रुवारी रोजी डॉलरचे दर कमी होऊन ७२.३९ रुपयांवर आले असताना त्या दिवशी चांदीत ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७० हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती, तर सोन्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ४७ हजार ५०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी डॉलर वधारून ७३.०५ रुपयांवर गेला असता चांदीत ५०० रुपयांची व सोन्यातही ५०० रुपयांनी घसरण झाली होती. २७ रोजी डॉलरमध्ये पुन्हा वाढ झाली त्यावेळी चांदीत एक हजार ५०० रुपयांनी, तर सोन्यात ५०० रुपयांनी घसरण झाली होती. 

चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ३ मार्च रोजी तर चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ झाली. बुधवारी डॉलरचे दर ७२.८१ रुपयांवर आले असताना चांदीच्या भावात दोन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.

टॅग्स :सोनं