Join us  

लग्नासाठी सोने खरेदी करण्याची आहे चिंता? नुकसान वाचविण्यासाठी तज्ज्ञांनी दिली 'भन्नाट आयडिया'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 2:38 PM

या वर्षी सोन्याचे दर 20 टक्क्याहून अधिक वाढले आहे.

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. काही दिवसांवर लग्नसराईचे मुहूर्त आले आहेत. त्यामुळे लग्नासाठी सोने खरेदी करावी लागणार आहे. तुळसी विवाहानंतर हिंदू परंपरेनुसार लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे ग्राहकांना चिंता लागली आहे की सोने खरेदी आता करावी की सोन्याचे दर घटण्याची वाट पाहावी. 

तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी थोडं थोडं सोने खरेदी करावे. जर दर जास्त घटले तर सोने खरेदी वाढवू शकता. मात्र गरजे इतकं सोने एकाचवेळी खरेदी करू नका. कॉमट्रेड्ज रिसर्चचे संचालक ज्ञानेश्वर त्यागराजन यांनी सांगितले की, सध्या अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरमुळे तसेच डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत घसरल्याने ही परिस्थिती कायम राहणार आहे. कदाचित सोन्याचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. जर भविष्यात सोन्याच्या दरात घट झाली तर ती फारशी नसेल. सध्याच्या परिस्थितीनुसार 1 हजार रूपयांपेक्षा घट होण्याची अपेक्षा फार कमी आहे. अशातच जर कोणाला सोने खरेदी करण्याची गरज असेल तर त्यांनी या पद्धतीचा वापर करावा असं त्यांची सूचविलं आहे. 

ऑल इंडिया सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरिंदर जैन यांनी म्हटलं आहे की, रूपयाची घसरण आणि जगातील रिझर्व्ह बँकांची मागणी यामुळे महागाई कायम राहणार आहे. तर अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर संपण्याची थोडी जरी चिन्हं दिसली तरी सोन्याच्या किंमतीत घट होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला हवं तेवढं सोनं एकाच वेळी खरेदी करण्याचा धोका घेऊ नका असं ते म्हणाले. 

या वर्षी सोन्याचे दर 20 टक्क्याहून अधिक वाढले आहे. सोन्याच्या खरेदीतही घट झाल्याचं दिसून आलं. जर कोणाला दोन-तीन महिन्यानंतर 100 ग्राम सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी 10-20 ग्राम सोने काही वेळाच्या अंतरामध्ये खरेदी करावं. सोन्याच्या दरात चढ-उतार होत असतो त्यामुळे सोने खरेदी करताना तुम्हाला जास्त नुकसान सहन करावं लागणार नाही. पुढील महिन्यात अमेरिकेतील रिझर्व्ह बँक व्याजदरात 0.25 टक्के घट करण्याची शक्यता आहे त्यामुळे महागाईत वाढ होईल असं सांगितलं जात आहे. त्याचसोबत काही जणांचे म्हणणं आहे की, ट्रेड वॉर संपुष्टात आल्यानंतर सूरतमध्येही सोन्याच्या दरात घट निर्माण होईल असं बोललं जातं आहे.   

टॅग्स :सोनंअमेरिकाचीन