Join us  

Gold Silver Price : सोनं झळाळलं, चांदी चमकली; पितृपक्ष असूनही 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 6:54 PM

Gold Silver Rate : सोन्यातील गुंतवणुकीकडे वाढता कल

नवी दिल्ली: आठवड्याला सुरुवात होताच सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत ४६० रुपयांची वाढ झाल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजनं सांगितलं. त्यामुळे सोन्याचा तोळ्यामागील दर ३८,८६० रुपयांवर जाऊन पोहोचला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरल्यानं आणि खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं सोन्याच्या दरात वाढ झाली. सध्याची बाजारातील स्थिती पाहता अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिली आहे. त्यामुळे सोन्याचा दर वाढला आहे.  सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली. शनिवारी प्रति तोळ्याचा दर ३८,४०० रुपये होता. तो आज ३८,८६० रुपयांवर गेला. सोन्यासोबतच चांदीची लकाकीदेखील वाढली आहे. आज चांदीच्या दरात १,०९६ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे आता एक किलो चांदीचा दर ४७,९५७ रुपयांवर जाऊन पोहोचला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरत आहे. याशिवाय भारतीय बाजारात मंदीसदृश्य स्थिती असल्यानं गुंतवणूकदारांनी पारंपारिक पर्याय असलेल्या सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्ध संपेल अशी आशा होती. त्यामुळे सोन्याच्या दरात १.२ टक्क्यांची घट झाली. मात्र त्यानंतर शनिवारी सकाळी सौदी अराम्कोच्या खनिज तेलाच्या विहिरींवर ड्रोन हल्ले झाले. त्यानंतर बाजारातील परिस्थिती बदलली. यानंतर गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती देण्यास सुरुवात केली. पुढचे काही दिवसदेखील हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याची झळाळी आणखी वाढू शकते.  

टॅग्स :सोनंचांदीखनिज तेल