Join us

गुड न्यूज! सोने-चांदीच्या दरावर संक्रांत; सोने ४९ हजारांच्या खाली, चांदी ९०० रुपयांनी कमी

By देवेश फडके | Updated: January 14, 2021 12:00 IST

सण-उत्सवाच्या काळात सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायदा बाजारात सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी कमालीची घसरण झाली आहे.

ठळक मुद्देसोन्याच्या दरात ४५० रुपयांची घसरणचांदीचा दर ९०० रुपयांनी झाला कमीसोने ४९ हजार रुपये, तर चांदी ६६ हजार रुपयांच्या खाली

नवी दिल्ली : सण-उत्सवाच्या काळात सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायदा बाजारात सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी कमालीची घसरण झाली आहे. वायदे बाजारातील सोने आणि चांदीच्या नफेखोरीने सोने-चांदीच्या दरावर संक्रांत ओढवल्याचे सांगितले जात आहे. 

भारतीय बाजारपेठेत सोन्याचा दर ०.९ टक्के म्हणजेच ४५० रुपयांनी घसरला आहे. यामुळे प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८ हजार ८६० रुपयांवर आली आहे. तर चांदीचा दर १.४ टक्के म्हणजेच ९०० रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर ६५ हजार १२७ रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी यांच्या दरात सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. 

जागतिक बाजारात सोन्याचा दर प्रती औंस १८४० डॉलर आहे. त्यात ०.९ टक्के घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रती औंस २५ डॉलरच्या आसपास आहे. जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचे दर ०.६ टक्क्यांनी वाढले व १,८४४.७ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले.

देशात कोरोना लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे कोरोना संकटाची अर्थव्यवस्थेतील तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच कमॉडिटी बाजारात गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचे पडसाद आज देशातील कमॉडिटी बाजारावर उमटले, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :सोनंचांदीअमेरिका