Join us  

Gold Price Today: बाबो! किंमती वाढताच दक्षिण भारतातील लोक जुने सोने बाहेर काढू लागले, 25 टक्क्यांनी विक्री वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 3:34 PM

Gold Rate Today: सोने ऑल टाईम हायवर. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यांना त्यांची गुंतवणूक काढून घेण्याची वेळ आली आहे.

सोन्याच्या दरांनी भल्या भल्यांना हादरवून सोडले आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी ३०-३५ हजाराला मिळणारे सोने आता ६० हजारावर गेले आहे. यामुळे नवीन दागिने करणाऱ्यांसाठी, लग्न करणाऱ्यांना जोरदार धक्का बसला आहे. लग्नाचा खर्च कमालीचा वाढला आहे. अशातच एक धक्कादायक ट्रेंड सराफा बाजारात दिसू लागला आहे. 

सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यांना त्यांची गुंतवणूक काढून घेण्याची वेळ आली आहे. २० मार्चला एमसीएक्सवर पाच एप्रिलच्या डिलिव्हरीचे सोने 970 रुपयांनी वाढले. हे सोने 60,338 रुपयांवर ट्रेड करत होते. एमसीएक्सवर ऑल टाईम हाय हा 58,847 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 

सोन्याचे दर वाढल्याने लोकांनी त्यांच्याकडील जुने सोने बाहेर काढले आहे. यामुळे जुन्या सोन्याच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. ज्वेलर्स आणि रिफायनर्सनुसार जुन्या सोन्याच्या विक्रीत वर्षाच्या आधारावर २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

याचा ट्रेंड दक्षिण भारतात अधिक आहे. लोक जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन सोन्याचे व्यवहार करत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च सोन्याच्या व्यवसायासाठी कमजोर महिने असतात. या दिवसांत लोकांना त्यांच्या मुलांसाठी शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पैसे साठवितात. यामुळे ते सोन्यावर कमी खर्च करतात, असे असोसिएशन ऑफ गोल्ड रिफाइनरीज एंड मिंट्सचे माजी सचिव जेम्स जोस यांनी सांगितले. 

जुन्या सोन्याच्या विक्रीत एवढी वाढ झालीय की लोक जुने सोने विकण्यासाठी रांगा लावू लागले आहेत. आर्थिक वर्ष काही दिवसांतच संपणार आहे. यामुळे देखील लोक कर वाचविण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करत आहेत. बुधवारी गुढी पाडवा असल्याने लोकांनी सोने विकले नाही, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउंसिलचे अध्यक्ष सैय्यम मेहरा  यांनी सांगितले. 

टॅग्स :सोनं