Join us  

सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोन्याचा दर 40 हजारांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 3:00 PM

सोमवारी सराफ बाजार उघडताच सकाळी 11 वाजताच्या सुमारास सोन्याचा दर 39 हजार रुपये होता.

मुंबई - सराफ बाजारात सोन्याची किंमत गगनाला भिडली असून आज सोन्याच्या दराने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सोन्याचा आजचा भाव 40 हजाराच्या वर गेला आहे. तर चांदीचे दरही वाढले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. सोन्याच्या वाढलेल्या किंमतीने नवा इतिहास रचला आहे. 

सोमवारी सराफ बाजार उघडताच सकाळी 11 वाजताच्या सुमारास सोन्याचा दर 39 हजार रुपये होता. साधारण दीड वाजताच्या सुमारास सोन्याच्या भावाने 40 हजाराचा टप्पा ओलांडला. सोन्याबरोबर चांदीचा दरही 45 हजारांच्या पलीकडे गेलेला आहे. चीनने अमेरिकेकडून आयात केलेल्या वस्तूंवर 75 अरब डॉलर अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. 

अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत आहेत. शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली, तरी सोने ६०० रुपये प्रति तोळा तर चांदी एक हजार रुपये प्रति किलोने वाढली. विदेशात वाढलेली या धातूंची खरेदी व विदेशी वायदे बाजारातून निघणारे वाढीव भाव, यामुळे भारतातही भाव वाढत आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव वाढत जाऊन वर्षभरात सोने तब्बल 9 हजार रुपये प्रती तोळा तर चांदी साडेतीन हजार रुपये प्रती किलोने महागली आहे.

सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. गेल्या वर्षी २ ऑगस्ट २०१८ रोजी ३० हजार २०० रुपयांवर असलेले सोने या वर्षी ऑगस्ट महिन्यात 40 हजाराच्या पुढे गेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची वाढलेली खरेदी व दुसरीकडे भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे. सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय. 

टॅग्स :सोनंचांदी