Join us  

कोरोनामुळे सोन्याला झळाळी; ग्राहकांना अपेक्षित असणारी सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 4:24 AM

नुकतीच आलेली सोन्यातील तेजी ही प्रामुख्याने आर्थिकक्षेत्रात कोरोना व्हायरसमुळे आलेल्या अनिश्चिततेमुळे आली आहे.

- अमित मोडकनुकतीच आलेली सोन्यातील तेजी ही प्रामुख्याने आर्थिकक्षेत्रात कोरोना व्हायरसमुळे आलेल्या अनिश्चिततेमुळे आली आहे. भारतात सोन्याचे जागतिक बाजारातील भाव वाढण्याबरोबरच रुपया डॉलरच्या तुलनेत गेल्या १० दिवसांत जवळपास एक टक्क्याने कमकुवत झाला. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने जेवढी तेजी येणे अपेक्षित होते त्यापेक्षा सुमारे ३५० रुपये प्रतिदहा ग्रॅमने जास्त तेजी आली. (डॉलर रुपयाचे मूल्य एक पैशाने बदलले तर सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम सुमारे ५.५० रुपये एवढा बदलतो.) सोन्यात जेवढ्या वेगाने तेजी आली (१६९१ डॉलर प्रतिऔंस) तेवढ्याच वेगात केवळ २४ तासांत सोन्यात पुन्हा सुमारे साडेतीन टक्के घट झाली. (१६३८ डॉलर प्रतिऔंस). हे पाहता कोरोनाबाबतची परिस्थिती सुधारली व जगभरात आर्थिक बाजार स्थिरावले तर सोन्याच्या भावात ग्राहकांना अपेक्षित असणारी सुधारणा दिसू शकते.भारतामध्ये सोन्यामध्ये तेजी किंवा मंदी होण्याच्या दोन कारणांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य बदलणे हे एक कारण असते, तर दुसरे कारण म्हणजे जागातिक बाजारात सोन्याच्या भावात तेजी होणे ज्यामध्ये एक डॉलर प्रतिऔंस आंतरराष्ट्रीय बाजारात भावामध्ये वध-घट झाल्यास सध्याच्या विनिमय दरानुसार सोने प्रतिदहा ग्रॅम वाढते किंवा घटते.सध्याच्या सोन्यातील तेजीला आर्थिक क्षेत्रातील अनिश्चितता कारणीभूत आहे, कारण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चीन बाजारपेठ ही अन्य सर्व बाजारपेठांना नॉन रिचेबल झाली आहे. यामुळे जगभरातील औद्योगिक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाचा व सुट्या भागांचा तुटवडा जाणवत आहे. याचा परिणाम म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये वाहननिर्मिती, इलेक्ट्रॉनिक वस्तू व औद्योगिक उपकरणे यांच्या निर्मिती व जडणघडण (जुळणी) करणारे उद्योग जवळपास बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत. अचानकपणे व तातडीने सुटे भाग बनविणारे उत्पादक निर्माण होणे अवघड असते व चीन इतक्या स्वस्त दरात पुरवठा करणारे पुरवठादार उपलब्ध होणे अवघड आहे. याचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही तोपर्यंत अनेक उद्योगक्षेत्रांत जगभरात रोजगारनिर्मिती होणार नाही. किंबहुना रोजगारात मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम म्हणून व्यावहारिक चलनवलन ठप्प होऊ शकते. तसेच, रोजगारात कपात झाल्याने एकूणच अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. या सर्वांचा परिणाम म्हणून जगभरात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि नेहमीप्रमाणेच अनिश्चिततेच्या काळात एकमेव असणारा आधार हा सोने. परिणामी याला मागणी आहे.

अनेक वित्तीय संस्था ज्या औद्योगिक भरभराटीत सहभागी होण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करीत असतात, त्यासुद्धा औद्योगिक क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारात विक्री करून निर्माण होणारी गंगाजळी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवत आहेत. त्याचाही परिणाम सोन्याचे भाव वाढण्यावर झाला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे (सुमारे २००८ ते २०१८) तेथील मध्यवर्ती बँकांनी सोन्यात गुंतवणूक केली नव्हती. मात्र, २०१९ या कॅलेंडर वर्षात युरोपातील काही मध्यवर्ती बँकांनी सुमारे साडेतीनशे टन एवढे सोने सुरक्षित चलन पर्याय गुंतवणूक केली आहे आणि हा ट्रेंड २०२० या वर्षात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या अल्पकाळात सोने पुन्हा १४०० डॉलर प्रतिऔंस किंवा त्यापेक्षा खाली येण्याची शक्यता नाही.इराणने इराकमधील अमेरिकी तळावर हल्ला केला त्यावेळेस सोने अचानक १६११ डॉलर प्रतिऔंस एवढे पोहोचले होते. त्यावेळेस थांबा, विचार करा व गुंतवणूक करा, असा सल्ला मी माध्यमांमधून दिला होता. तोच सल्ला आजही राहील.कारण अचानकपणे उद्भवणाऱ्या अडचणी व धोके या मोठ्या प्रमाणावर वध-घट निर्माण करीत असतात. मात्र, अशी झालेली वध-घट फार दीर्घ काळ टिकून राहण्याची शक्यता नसते.(लेखक कमॉडिटीतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :सोनं