Join us  

रेमंड ग्रुपच्या प्रमुखांचा घटस्फोट; पोटगी म्हणून पत्नीने मागितले 8,745 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 2:56 PM

रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया आणि पत्नी नवाज मोदी-सिंघानिया घटस्फोट घेत आहेत.

Gautam Singhania: रेमंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सिंघानिया  यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. लग्नाच्या 32 वर्षानंतर ते पत्नी नवाज मोदी-सिंघानियाला घटस्फोट देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पत्नीने घटस्फोटासाठी मोठ्या अटी ठेवल्या आहेत आणि गौतम यांच्याकडे त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 75% रक्कम मागितली आहे.

गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर (सुमारे 11,660 कोटी रुपये) आहे. या संदर्भात नवाज मोदी-सिंघानिया यांनी घटस्फोटाच्या बदल्यात सिंघानिया कुटुंबाकडे 8,745 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाज मोदी-सिंघानिया यांनी ही रक्कम स्वतःसाठी आणि त्यांच्या दोन मुली, निहारिका आणि नीसा यांच्यासाठी मागितली आहे.

गौतम सिंघानिया सहमत होतील का?रिपोर्ट्सनुसार, गौतम सिंघानिया या मागणीला सहमती देऊ शकतात. मात्र मालमत्तेचा हिशेब थेट होणार नाही. त्याऐवजी त्यांनी कौटुंबिक ट्रस्ट तयार करण्याचे सुचवले आहे. या ट्रस्टकडे कुटुंबाच्या सर्व मालमत्ता आणि मालमत्तेचे मालकी हक्क असतील. ते या ट्रस्टचे एकमेव विश्वस्त असतील. त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना मृत्युपत्र करण्याचा अधिकार असेल. मात्र, नवाझ मोदी सिंघानिया याला सहमत होण्याची शक्यता नगण्य आहे.

प्रकरण कसे सुटणार?मीडिया रिपोर्ट्सनुसार, खेतान अँड पार्टनरचे एच. खेतान, यांना या संपूर्ण प्रकरणात गौतम सिंघानियाचे कायदेशीर सल्लागार बनवण्यात आले आहे. तर मुंबईच्या रश्मी कांत, नवाज यांच्या वकील होतील. कौटुंबिक ट्रस्ट तयार करून गौतम सिंघानिया यांना एकमेव अध्यक्ष आणि विश्वस्त राहणे कठीण होऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ट्रस्टच्या स्थापनेशी संबंधित कायद्यानुसार, ट्रस्ट चालवण्यासाठी 3 मुख्य पक्ष आहेत. यामध्ये ट्रस्ट सेटलर, एक ट्रस्टी, जो प्रशासकीय प्रमुख आहे आणि एक लाभार्थी यांचा समावेश आहे. एकच व्यक्ती तिन्ही पदे भूषवू शकत नाही.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकघटस्फोटन्यायालयरेमंड