Adani Group News: अहमदाबादयेथील डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (DPIL) या कंपनीतील हिस्सा खरेदी करण्यात अदानी समूहाचं नाव आघाडीवर आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली. मात्र, हा हिस्सा मिळविण्यासाठी आणखी दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचा समूह डीपीआयएलमध्ये स्वारस्य दाखवत आहे कारण त्यांना आपली व्हेंडर इकोसिस्टम सुधारायची आहे. येत्या काही वर्षांत अदानी समूहाच्या भांडवली खर्चात लक्षणीय वाढ होणार आहे.
ईटीनं दिलेल्या वृत्तानुसार, डीपीआयएल ही अशी कंपनी आहे जी इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित अनेक गोष्टी करते. केबल, कंडक्टर, ट्रान्समिशन टॉवर आणि विजेचे पारेषण व वितरण अशा क्षेत्रात हे काम करते. ट्रान्समिशन लाइन टॉवर्स आणि त्यांचे पार्ट्स तयार करणं आणि बसवणं यातही कंपनी गुंतलेली आहे. हे काम टर्नकी तत्त्वावर होते, याचा अर्थ कंपनी सर्व काही स्वत: करते. भारताच्या इलेक्ट्रिक उद्योगात वायर आणि केबलचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. २०२३ मध्ये त्याची बाजारपेठ ८.७ अब्ज डॉलर्सची होती आणि २०३२ मध्ये ती १७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
BMW, सुपरबाईक... लालूंनी ज्या मुलाला दाखवला पक्षातून बाहेरचा रस्ता ते तेजप्रताप यादव किती श्रीमंत?
प्रवर्तकांचा हिस्सा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीपीआयएलमध्ये अदानी समूहासह तीन कंपन्या हिस्सा खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहेत. बीएसईमध्ये लिस्टेड डीपीआयएलच्या प्रवर्तकांकडे सध्या कंपनीत ९०% हिस्सा आहे, जो मार्च २०२४ मध्ये ९४.८८% होता. सेबीच्या नियमांनुसार प्रवर्तकांना कंपनीतील आपला हिस्सा ७५ टक्क्यांपर्यंत खाली आणावा लागतो. येत्या ६० दिवसांत हा करार होईल, अशी अपेक्षा आहे. डीपीआयएलचं बाजार भांडवल सुमारे पाच हजार कोटी रुपये आहे.
मात्र, प्रवर्तकांना कंपनीतील किती हिस्सा विकायचा आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. डीपीआयएलच्या हिस्स्याच्या खरेदीसाठी अदानी समूह वगळता अन्य कोणत्या कंपन्या स्पर्धा करत आहेत, हेही अस्पष्ट आहे. डीपीआयएलला २०२२ मध्ये जीएसईसी लिमिटेड आणि राकेश शाह यांच्या एका कन्सोर्टियमनं नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) प्रक्रियेद्वारे खरेदी केलं होतं.
काय आहे प्लॅन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूह कंपनीतील हिस्सा विकत घेतल्यानंतर विद्यमान व्यवस्थापनाला पदभार स्वीकारण्याची परवानगी देऊ शकतो. असंच काहीसं त्यांनी पीएसपी प्रोजेक्ट्स लिमिटेड या बांधकाम कंपनीसोबत केलं. अदानी समूहानं गेल्या वर्षी पीएसपी प्रोजेक्ट्समधील ३०.०७ टक्के हिस्सा ६८५ कोटी रुपयांना खरेदी केला होता. याशिवाय गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अदानी समूहाची कंपनी रिन्यू एक्झिम डीएमसीसीनेही आयटीडी सिमेंटेशन इंडियामध्ये मोठा हिस्सा खरेदी केला होता. आयटीडी सिमेंटेशन ही एक इंजिनीअरिंग आणि बांधकाम कंपनी आहे जी भारत आणि परदेशात नागरी, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकामात काम करत आहे.
अदानी समूहानं चालू आर्थिक वर्षात आपला भांडवली खर्च १५ टक्क्यांनी वाढवून १.४ ते १.४५ लाख कोटी रुपये करण्याची योजना आखली आहे. २०२५ या आर्थिक वर्षात भांडवली खर्च १,२६,००० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. डीपीआयएलनं या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर आपल्या कामकाजाचा विस्तार करण्यासाठी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. येत्या तीन वर्षांत कंपनीला १० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवायचा आहे. २०२५ या आर्थिक वर्षात कंपनीला ३४३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. अदानी समूह आणि डीपीआयएल या दोघांनीही यासंदर्भात कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.