Join us  

Adani Group : टाटा-अंबानींना टक्कर देण्यासाठी अदानींचा जबरदस्त प्लॅन, 'या' कंपनीत खरेदी केला हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 3:38 PM

Gautam Adani News: गौतम अदानी यांच्या अदानी समुहानं (Adani Group) ऑनलाइन ट्रॅव्हल बिझनेसमध्ये घेतली एन्ट्री.

अदानी उद्योगसमूहाने (Adani Group) क्लिअर ट्रिप प्रायव्हेट लिमिटेड (Cleartrip Private Limited) या ऑनलाइन पर्यटन, आदरातिथ्य क्षेत्रातील कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऑनलाइन तसेच ॲपच्या माध्यमातून पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य क्षेत्रात कार्यरत असणारी क्लिअर ट्रिप ही कंपनी फिल्पकार्ट समूहाचा (Flipkart Group) भाग आहे. अदानी समूहाकडून क्लिअर ट्रिपमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. येत्या महिनाभरात यासंदर्भातील भागभांडवल खरेदीचा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर क्लिअर ट्रीप ही अदानी समूहाची ऑनलाइन ट्रॅव्हल ॲग्रिगेटर म्हणून काम पाहणार आहे. 

या गुंतवणुकीमुळे अदानी समूह आणि फ्लिपकार्ट यांच्यातील धोरणात्मक भागीदारी वाढणार आहे. फ्लिपकार्टने ताबा मिळविल्यापासून क्लिअर ट्रिपच्या हवाई प्रवासाच्या बुकिंगमध्ये दहा पट वाढ झाली होती. कोविड महामारीतील निर्बंध हटू लागल्याने हवाई प्रवास आणि पर्यटन उद्योग रूळावर येत आहे. या पार्श्वभूमीवर अदानी आणि फ्लिपकार्ट यांच्यातील ही भागीदारी ग्राहकांसाठी अधिक व्यापक सेवासुविधा उपलब्ध करून देणारी ठरणार आहे. या भागीदारीमुळे क्लियर ट्रिपला आपल्या डिजिटल सीमा ओलांडत एंड-टू-एंड प्रवास सेवा ऑनलाइन आणणे शक्य होणार आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, फ्लिपकार्टसोबत डेटा सेंटर्स, पूर्तता केंद्रे आणि आता हवाई प्रवासासह अनेक क्षेत्रात आमची भागीदारी आहे. स्वदेशी कंपन्यांमधील ही एक धोरणात्मक भागीदारी आहे. यातून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. क्लिअर ट्रिप प्लॅटफॉर्म आम्ही सुरू केलेल्या व्यापक सुपरॲप प्रवासाचा एक आवश्यक भाग बनेल, असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला.

ग्राहकांना चांगल्या सुविधातर, अदानी उद्योगसमूहासोबतच संबंध दृढ करण्याची आमची भूमिका असल्याचे फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले. आगामी काळात प्रवासी संख्या वाढत जाणार आहे. अदानी समूहाकडील पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक आकर्षक आणि चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

टॅग्स :अदानीफ्लिपकार्ट