Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळ, कपडे धुणंही महागलं; साबण, शॅम्पू, टूथपेस्टसह अनेक वस्तू १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 12:01 IST

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने पुन्हा एकदा साबण, शॅम्पू आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे.

मुंबई : सामान्य नागरिकांसाठी आता आंघोळ करणे आणि कपडे धुणेही महागले आहे. देशातील सर्वांत मोठा एफएमसीजी ब्रँड हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने पुन्हा एकदा साबण, शॅम्पू आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या उत्पादनांच्या किमतीमध्ये तब्बल १५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 

कंपनीने कॉफी, केचअप, टूथपेस्टच्या किमतीतही ४ ते १३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. याच आठवड्यात हिंदुस्तान युनिलिव्हरचे सीईओ संजीव मेहता यांनी पामतेल आणि कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने कारण देत उत्पादनाच्या किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले होते.

शॅम्पूच्या किंमतीत मोठी वाढकंपनीने शॅम्पूच्या किमतीमध्ये सर्वात जास्त १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. सनसिल्क शॅम्पूच्या सर्व प्रकारांमध्ये ८ ते १० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.  क्लिनिक प्लस शॅम्पूच्या १०० एमएल पॅकच्या किमतीमध्ये सर्वात जास्त १५ टक्के वाढ झाली आहे. 

याचवेळी रोजच्या वापरासाठी गरजेच्या असलेल्या ग्लो अँड लव्हलीच्या किमतीत ६ ते ८% आणि पॉन्ड टालकम पावडरच्या किमतीमध्ये ५ ते ७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. 

या जानेवारीपासून या उत्पादनांमध्ये ही चौथी मोठी वाढ असल्याने किमती महाग झाल्या असून, महागाईच्या संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला मोठा फटका बसला आहे. 

मार्च तिमाहीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचा नफा ९ टक्क्यांनी वाढला आहे. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीला २,३२७ कोटी रुपयांचा नफा झाला असून, गेल्या वर्षी तो या तिमाहीत २,१४३ कोटी रुपये (८.५८%) होता. गोदरेज, आरबी हेल्थ, विप्रो, आयटीसी, ज्योती लॅब्स या कंपन्यांनी उत्पादनाच्या किमतीत नुकतीच वाढ केली.

या वस्तू महागल्यालक्स साबण, पिअर्स साबण, शॅम्पू, कॉफी,  केचअप, टूथपेस्ट, सनसिल्क शॅम्पू, क्लिनिक प्लस शॅम्पू , ग्लो अँड लव्हली, पॉन्ड टालकम पावडर

घरोघरी फटकाहिंदुस्तान युनिलिव्हरने १२५ ग्रॅम पिअर्स साबणाच्या किमतीमध्ये २.४ टक्क्यांनी वाढ केली असून, मल्टीकॅपमध्ये ३.७ टक्के वाढ केली आहे. तर घरोघरी आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या लक्स साबणाच्या किमतीमध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.हॉर्लिक्स, कॉफीही महाग

  • रोजच्या वापरातील वस्तू व शॅम्पू साबणासह कंपनीने खाण्यापिण्याच्या वस्तूचेही भाव वाढवले आहेत. हॉर्लिक्स, 
  • ब्रू कॉफी आणि किसान केचअप ही उत्पादनेही ४ ते १३% महाग केली आहेत. 
  • किमती वाढवल्याने कंपनीला वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून दिले आहे. 
  • रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर एफएमसीजी कंपन्या सतत आपल्या उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ करत आहे. 
  • किमतीमध्ये वाढ करण्याची कंपन्यांची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांतही किमतीत वाढ करण्यात आली होती. यापूर्वी केवळ साबणाच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. आता मात्र सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
टॅग्स :व्यवसाय