Join us

मोफत दारू, हँगओव्हर लिव्ह... ही कोणती कंपनी जी कर्मचाऱ्यांना देतेय अशी ऑफर; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 09:46 IST

तुम्हीही जर ऑफिसला जात असाल तर तुम्हालाही सिक लिव्ह, पर्सनल लिव्ह अशा काही सुट्ट्या मिळत असतील. पण जर तुम्हाला सांगितलं की कंपनी हँगआऊट लिव्ह देत असेल तर? तुम्हाला हे खरं वाटेल का?

काही दिवसांपूर्वीच ७० तास ९० तास काम करण्याचे सल्ले तुम्ही नक्कीच ऐकले असतील. तुम्हीही जर ऑफिसला जात असाल तर तुम्हालाही सिक लिव्ह, पर्सनल लिव्ह अशा काही सुट्ट्या मिळत असतील. पण जर तुम्हाला सांगितलं की कंपनी हँगआऊट लिव्ह देत असेल तर? तुम्हाला हे खरं वाटेल का? पण हे अगदी खरंय. जपानची सॉफ्टवेअर कंपनी ट्रस्ट रिंग आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत दारू आणि हँगओव्हर लिव्ह देत आहे. नवीन टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी आणि अनौपचारिक कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे केलं जात आहे. काही लोक या धोरणाचं कौतुक करत आहेत. त्याचबरोबर अनेकजण त्याच्या परिणामांवरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

जपानमधील ओसाका येथील ट्रस्ट रिंग कंपनी लिमिटेड (Trust Ring Co., Ltd.) ही कंपनी आपल्या खास हायरिंग स्ट्रॅटजीमुळे चर्चेत आहे. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत दारू आणि हँगओव्हर लिव्ह सारखे फायदे दिलेत. नवीन टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी आणि वेगळ्या प्रकारचे कामाचं वातावरण तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

मोठ्या कंपन्यांना टक्कर

असं मानलं जातंय की ही रणनीती लहान कंपन्यांसाठी उच्च वेतन आणि फायदे देणाऱ्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा एक मार्ग असू शकतो. हे धोरण कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच सांगेल. परंतु, ते नक्कीच लोकांचं लक्ष मात्र वेधून घेत आहे. यामुळे कामाच्या ठिकाणच्या संस्कृतीवर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ताकुया सुगिउरा नवीन कर्मचाऱ्यांचं स्वागत करतात आणि त्यांना ड्रिंक्स देतात. यावरून कंपनीला अनौपचारिक वातावरण निर्माण करायचं असल्याचं दिसून येतं.

धोरणाबाबत निरनिराळे दृष्टीकोन

काही लोक या धोरणाला स्वप्नासारखं मानतात. दिवसभराच्या कामानंतर विनामूल्य मद्यपान करणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हरची चिंता न करणं, बऱ्याच लोकांसाठी मोहक असू शकतं. परंतु, काही लोक या धोरणाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करतात. यामुळे खरोखरच उत्पादकता वाढेल की हा केवळ धोकादायक प्रयोग आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

विशेष म्हणजे कंपनी मोफत दारू तर देत आहेच, शिवाय हँगओव्हरमधून सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारी रजाही देत आहे. हे धोरण कंपनीला इतर कंपन्यांपेक्षा वेगळे बनवतंय. इतकंच नाही तर नवीन टॅलेंटला आकर्षित करण्यात मदत होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

कंपनीचा सुरुवातीचा पगार २,२२,००० येन (सुमारे १.२७ लाख रुपये) आहे. याशिवाय २० तासांचा ओव्हरटाईमही दिला जातो. विनामूल्य अल्कोहोल आणि हँगओव्हर रजा असलेले हे पॅकेज अनेकांना आकर्षित करू शकतं.

टॅग्स :व्यवसायजपान