Join us

भारतीय कंपन्यांच्या विदेशी कर्जात ४७ टक्क्यांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 01:45 IST

ऑगस्ट २०१९ मध्ये भारतीय कंपन्यांनी ‘विदेशी व्यावसायिक उसनवाऱ्यां’च्या (ईसीबी) माध्यमातून एकूण ३.३२ अब्ज डॉलरचे कर्ज विदेशातील भांडवली बाजारातून उभारले होते.

नवी दिल्ली : भारतीय कंपन्यांकडून विदेशातून घेण्यात येणाऱ्या कर्जात ऑगस्टमध्ये ४७ टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये भारतीय कंपन्यांनी विदेशातून १.७५ अब्ज डॉलरचे कर्ज उभारले.रिझर्व्ह बँकेने यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये भारतीय कंपन्यांनी ‘विदेशी व्यावसायिक उसनवाऱ्यां’च्या (ईसीबी) माध्यमातून एकूण ३.३२ अब्ज डॉलरचे कर्ज विदेशातील भांडवली बाजारातून उभारले होते.यंदाच्या आॅगस्टमध्ये ईसीबीच्या माध्यमातून कंपन्यांनी १.६१ अब्ज डॉलर उभारले तसेच १४५.७४ दशलक्ष डॉलर ‘रुपयाधिष्ठित रोख्यां’च्या (आरडीबी) माध्यमातून उभारले.रिझर्व्ह बँकेने म्हटले की, ईसीबी श्रेणीतील १.५७ अब्ज डॉलरचे कर्ज ‘स्वचलित मार्गा’ने (आॅटोमॅटिक रूट) उभारले गेले असून, ३५.९३ दशलक्ष डॉलर मंजुरीच्या मार्गाने आले आहेत. ईसीबीद्वारे कर्ज उभारणाºया बड्या भारतीय कंपन्यांत रिलायन्स सिबूर एल्स्टॉमर्स आघाडीवर आहे.रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बीएमडब्ल्यू इंडिया फायनान्शिअल सर्व्हिसेसने ८८.७२ दशलक्ष डॉलरचे विदेशी कर्ज घेतले. हा निधी कंपनी कर्ज देण्यासाठी वापरणार आहे. बिर्ला कार्बन इंडियाने ५० दशलक्ष डॉलरचे कर्ज उभारले. आधीचे रुपयातील कर्ज फेडण्यासाठी कंपनीने हे कर्ज घेतले आहे. संगणक, इलेक्ट्रॉनिक्स आणि आॅप्टिकल उत्पादने क्षेत्रातील विस्टॉर्न इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. कंपनीने ४५ दशलक्ष डॉलरचे कर्ज घेतले आहे. याद्वारे कंपनी भांडवली वस्तूंची आयात करणार आहे.रसायने आणि रासायनिक उत्पादने बनविणाºया या कंपनीने पुनर्वित्तीकरणासाठी ३३९.४२ दशलक्ष डॉलरचे विदेशी कर्ज ईसीबीद्वारे उभारले आहे. विजयपुरा टॉलवे या कंपनीने १६० दशलक्ष डॉलर उभारले आहेत. ही पायाभूत विकास क्षेत्रातील कंपनी आहे. चायना स्टील कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि.ने १०४.५ दशलक्ष डॉलर फेरभांडवलीकरणासाठी उभारले आहेत.