Join us

फ्लिपकार्ट, स्विगीने बुडविला तब्बल 950 कोटी रुपयांचा कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 01:11 IST

कंपन्यांवर छापे : प्राप्तिकर विभागाच्या तपासणीत माहिती समोर

लोकमत न्यूज नेटवर्क बंगळुरू : खाद्य अग्रीगेटर कंपनी स्विगी आणि अन्य एक कंपनी इन्स्टाकार्ट यांनी ९५० कोटी रुपयांचा कर बुडविल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. इन्स्टाकार्ट ही वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टची एक समूह कंपनी आहे.प्राप्तिकर विभागाने या दोन्ही कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे मारून कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ही माहिती समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विगीने आपल्याला मिळणारे कमिशन आणि कॅन्सलेशन शुल्कावर टीडीएस कापून देणे अपेक्षित आहे. तथापि, कंपनीने ते टाळले आहे. फ्लिपकार्टने आपला तोटा इन्स्टाकार्टवर ढकलून कर टाळला आहे. फ्लिपकार्टने टाळलेला कर ६५० कोटी रुपयांचा, तर स्विगीने टाळलेला कर ३०० कोटी रुपयांचा आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेतील इनपूट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याच्या तपासादरम्यान स्विगी आणि फ्लिपकार्टच्या कर बुडवेगिरीचा सुगावा जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांना लागला होता. त्यातून प्राप्तिकर विभागाच्या वतीने छापेमारी करण्यात आली. फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने आरोप फेटाळून लावले आहेत. 

प्रवक्त्याने सांगितले की, अधिकाऱ्यांनी आमच्या ठिकाणांवर सर्वेक्षण केले आहे. आम्ही पूर्ण सहकार्य करून सर्व आवश्यक कागदपत्रे चौकशी पथकांना पुरविली. आमचे अधिकारी नियमितपणे कर अधिकाऱ्यांसमोर हजर झालेले आहेत. जेव्हा जेव्हा बोलावणे येईल, तेव्हा तेव्हा आम्ही कर प्राधिकरणासोबत काम करू, असे देखील संबंधित प्रवक्त्याने यासंदर्भात बोलताना सांगितले.

सगळे कर भरल्याचा दावास्विगीनेही आरोप फेटाळले आहेत. कंपनीने म्हटले की, देय असलेले सर्व कर कंपनीने अदा केले आहेत. तपास संस्थांकडून आम्हाला कर कायदे पालनातील त्रुटींबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाही. स्विगी ही कायद्यांचे तंतोतंत पालन करणारी कंपनी आहे. कंपनीने सगळे कर वेळेत भरले आहेत. 

टॅग्स :व्यवसायफ्लिपकार्ट