संपूर्ण देशाचे आज आणि उद्या होत असलेल्या जीएसटी परिषदेकडे लक्ष लागले आहे. महागाईने होरपळलेल्या जनतेला जीएसटी कमी झाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. अशातच जीएसटी परिषदेबाबत महत्वाची बातमी येत आहे. जीएसटी कौन्सिलने २५०० रुपयांपर्यंतच्या पादत्राणे आणि कपड्यांवरील जीएसटी दर कमी करून ५ टक्के करण्यास मंजुरी दिली असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ व्या जीएसटी कौन्सिलने ५ टक्के स्लॅबमधील पादत्राणे आणि कपड्यांसाठीची मर्यादा १,००० रुपयांवरून २,५०० रुपये प्रति नग करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत ही परिषद होत आहे.
सध्या, १,००० रुपयांपर्यंतच्या पादत्राणे आणि कपड्यांवर ५ टक्के कर आकारला जातो. या मर्यादेपलीकडे, १२ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. आता ५ टक्के हा कर स्लॅब २५०० पर्यंतच्या चप्पल आणि कपड्यांवर आकारला जाणार आहे. यामुळे शॉपिंग करणाऱ्यांसह ही उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
जीएसटी कौन्सिलने बुधवारी १२ आणि २८ टक्के स्लॅब रद्द करण्याचा आणि या स्लॅबमधून बहुतेक वस्तू अनुक्रमे ५ आणि १८ टक्के स्लॅबमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.