Join us  

देशभरात ‘एक वाहन, एकच फास्टॅग’, एका वाहनासाठी अनेक फास्टॅग आता वापरता येणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 9:00 AM

FASTag: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चा ‘एक वाहन, एक फास्टॅग’ हा नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका वाहनाशी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा यामागील उद्देश आहे.

 नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चा ‘एक वाहन, एक फास्टॅग’ हा नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका वाहनाशी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा यामागील उद्देश आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आता एका वाहनावर एकापेक्षा जास्त फास्टॅग लावता येणार नाहीत. ज्यांच्याकडे एका वाहनासाठी अनेक फास्टॅग आहेत ते १ एप्रिलपासून ते वापरू शकणार नाहीत. एनएचएआयने पेटीएम फास्टॅग वापरणाऱ्या वाहनधारकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रमाचे पालन करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली होती.

एकच फास्टॅग का? - इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल  प्लाझावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी एनएचएआयने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम सुरू केला आहे. - एकापेक्षा अधिक वाहनांसाठी एकच  फास्टॅग वापरण्यास बंदी घालणे आणि एकाच वाहनासाठी अनेक फास्टॅग वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

फास्टॅग कसे काम करते? फास्टॅग ही भारतातील टोल संकलनाची इलेक्ट्रॉनिक प्रणाली असून, ती एनएचएआयकडून चालविली जाते. फास्टॅगमध्ये थेट टोल मालकाशी जोडलेल्या प्रीपेड किंवा बचत खात्यातून थेट टोल पेमेंट करण्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञान वापरले जाते.

टॅग्स :फास्टॅगरस्ते वाहतूक