Join us
Daily Top 2Weekly Top 5

कारखाने जोरात; वीज वापर, उत्पादनात वाढ; १० महिन्यांत मागणी ७.५ टक्के वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 07:23 IST

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत (एप्रिल-जानेवारी) देशातील विजेचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत ७.५ टक्क्यांनी वाढला आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत (एप्रिल-जानेवारी) देशातील विजेचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत ७.५ टक्क्यांनी वाढला आहे. देशातील औद्योगिक हालचाली वाढल्याचा सकारात्मक संदेश यातून मिळत आहे. देशातील विजेचा एकूण वापर सध्या १,३५४ अब्ज युनिट इतका झाला आहे. २०२२-२३ वर्षात याच कालावधीत विजेचा वापर १,२५९ अब्ज युनिट इतका होता, अशी माहिती ऊर्जा मंत्रालयाने दिली.

ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये वीज वापरात झपाट्याने वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते आर्थिक घडामोडींमध्ये झालेली वाढ आणि थंडीची लाट यामुळे फेब्रुवारीमध्येही विजेच्या वापरात वाढ होऊ शकते. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजात २०२३-२४ मध्ये देशाचा आर्थिक विकास दर ७.३ टक्के इतका राहील, असे म्हटले आहे.

जानेवारीत जादा मागणी

उत्तर भारतात पारा झपाट्याने घसरल्याने जानेवारीमध्ये विजेचा वापर वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. थंडीच्या लाटेमुळे हीटर्स, ब्लोअर्स आणि गिझर आदी उपकरणांचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे.

जानेवारीमध्ये १२६ अब्ज युनिट विजेचा वापर झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यात ५.४ टक्के वाढ झाली. जानेवारीत एका दिवसातील विजेची कमाल मागणी २२२ गीगाव्हॅट इतकी होती. जानेवारी २०२३ मध्ये हेच प्रमाण २१० गीगाव्हॅट इतके होते.