Join us  

फेसबुकचे लिब्रा भारतात मिळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 4:05 AM

फेसबुक पुढील वर्षी लिब्रा हे आभासी चलन बाजारात आणणार

मुंबई: सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक पुढील वर्षी लिब्रा हे आभासी चलन बाजारात आणणार आहे. परंतु ते भारतात उपलब्ध होणार नाही, अशी माहिती सोशल मीडिया क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.भारतामध्ये रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी बिटकॉईन या आभासी चलनावर बंदी घातली होती. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारात सटोडियांनी एका बिटकॉईनचा भाव तब्बल २०,००० डॉलर्सपर्यंत नेला होता. त्यामुळे चढ्या दरात बिटकॉईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धोका निर्माण झाला होता म्हणून रिझर्व्ह बँकेने ही बंदी आणली होती. भारतीय कायद्यानुसार कुठलेही चलन किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित उत्पादन बाजारात आणायचे असेल तर रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक आहे. परंतु फेसबुकने अजून लिब्रासाठी बँकेकडे अर्जच केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.फेसबुकची उपकंपनी ‘कॅलिब्रा’ लिब्रा हे आभासी चलन आणणार असल्याची चर्चा आहे. परंतु ज्या देशांमध्ये आभासी चलन व फेसबुकवर बंदी आहे अशा देशांमध्ये लिब्रा सादर होणार नाही. दरम्यान, लिब्रा हे आभासी चलन प्रचलित करण्यासाठी फेसबुकने व्हिसा, मास्टरकार्ड, उबर, पे-यू अशा २८ डिजिटल पेमेंट कंपन्यांशी सहकार्य करार केला आहे. प्रत्यक्षात लिब्रा बाजारात येईल तोपर्यंत १०० कंपन्यांशी असे करार झालेले असतील, अशी माहिती आहे.फेसबुकच्या लिब्रा चलनाला अमेरिकन खासदारांकडूनही विरोध सुरू झाला आहे. अमेरिकन संसदेच्या आर्थिक व्यवहार समितीच्या अध्यक्षा मॅक्झीन वॉटर्स यांनी जोपर्यंत संसद (हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटीव्हज्) व राज्यसभा (सिनेट) लिब्राच्या व्यवहाराबदल पूर्ण तपासणी करीत नाही तोपर्यंत फेसबुकने लिब्रा बाजारात आणू नये, असा आदेशच पारित केला आहे.

टॅग्स :फेसबुक