Join us  

फॅब इंडियाचा IPO लवकरच; सेबीकडे कागदपत्र सादर करणार, किती कोटी उभारणार? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 2:53 PM

फॅब इंडियाची देशभरातील ११८ शहरांमध्ये ३११ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १४ स्टोअर्स आहेत.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, असे असले तरी अनेकविध क्षेत्रातील कंपन्यांने IPO एकामागून एक शेअर मार्केटमध्ये येऊन धडकत आहेत. यातच आता एथनिक वेअर रिटेल चेन असणारी कंपनी फॅब इंडिया सेबीकडे कागदपत्रे सादर करणार असून, लवकरच त्यांचा आयपीओ बाजारात सादर केला जाईल, असे सांगितले जात आहे. या आयपीओतून फॅब इंडियाला २० हजार कोटींचे मूल्यांकन अपेक्षित आहे. 

सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये ५०० कोटींहून अधिक नवीन इश्यू जारी केले जातील, तर OFS अर्थात ऑफर फॉर सेलचे मूल्य ३ हजार ५०० कोटी रुपये असेल. फॅब इंडियाला त्यांच्या ई-कॉमर्स व्यवसायातून १० ते १५ टक्के विक्री मिळते. ऑनलाइन विक्री वाढवण्याचा मानस कंपनीचा आहे. याशिवाय, कोरोना संकटानंतर विक्रीत वाढ होण्यासाठी नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना कंपनीने आखली आहे.

रोहिणी नीलेकणी यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांचा पाठिंबा 

फॅब इंडियामधील गुंतवणूकदार प्रेमजी इन्व्हेस्ट कंपनीतील काही भागभांडवल विकण्याची अपेक्षा आहे. कंपनीला लाइटहाऊस फंड, कोटक सिक्युरिटीज, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी नीलेकणी यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे. आताच्या घडीला फॅब इंडियाची देशभरातील ११८ शहरांमध्ये ३११ स्टोअर्स आणि १४ आंतरराष्ट्रीय स्टोअर्स आहेत. कंपनी पोशाख, होम फर्निशिंग, फर्निचर, भेटवस्तू, दागिने, सेंद्रिय अन्न आणि पर्सनल केअर उत्पादने विकते.

दरम्यान, जॉन बिसेल यांनी सन १९६० मध्ये फॅब इंडियाची स्थापना केली होती. ही कंपनी देशभरातील खेड्यांतून मोठ्या प्रमाणात उत्पादने खरेदी करते आणि जगाला हातमाग कापड आणि फर्निचर विकते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ५५ हजारांहून अधिक उत्पादकांना शहरी बाजारपेठांशी जोडते आणि सुमारे ५०० विद्यार्थ्यांसह तिची स्वतःची शाळा देखील चालवते. 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार