Join us  

खूप खर्च होतोय...काही मिनिटांत या मार्गाने वाचवा पैसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:31 PM

प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे खिशावर मोठा ताण जाणवत आहे. महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा वाढत चालल्याने सारेच हैराण झाले आहेत.

मुंबई : प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे खिशावर मोठा ताण जाणवत आहे. महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा वाढत चालल्याने सारेच हैराण झाले आहेत. मात्र, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे काही उपाययोजना केल्यास काही प्रमाणात का होईना वाया जाणारा पैसा वाचू शकतो. 

बँक बदला : आता तुम्ही म्हणाल की बँक का बदलायची? आज देशात 20 च्या वर राष्ट्रीय बँका आहेत. मात्र, प्रत्येक बँकेचा व्याजदर हा वेगवेगळा आहे. काही बँकांच्या दरात तर काही अंशांमध्ये फरक आढळतो. यामुळे याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हाच पैसा जर वाचविला तर त्याचे काही काळाने एका मोठ्या रकमेमध्ये रुपांतर होते. यामुळे बचत खाते असो की कर्ज व्याजदर कमी-जास्त पाहुनच त्या बँकेमध्ये खाते काढावे. तसेच घर, कार्यालयाजवळ असलेलीच बँक निवडावी. कारण बँकेत जाण्या-येण्यामध्येच बऱ्याचदा जास्त पैसे खर्च होतात. ही पण एक प्रकारची बचतच आहे. 

इंटरनेटची सेवा घेत असाल तर त्या बिलामध्येही सूट मिळविता येते. सेवा पुरविणाऱ्यासोबत बऱ्याच काळापासून जोडले गेला असाल तर बिलमधील रक्कम कमी करण्यासाठी त्याच्याशी चर्चा करू शकता. त्यांच्याकडे काही काळाने ऑफर्स सुरु असतात. यामुळे या ऑफरचा लाभ बऱ्याचदा मिळण्याची शक्यता असते. 

अॅटो पेमेंट सुरु करा : वीज बिल, पाणी बिल, फोनचे बिल भरण्याची तारिख उलटून गेल्यास काही पैसे आकारले जातात. हे पैसे कधी ना कधी भरावेच लागतात. ही लेट फी वाचविण्यासाठी काही वॉलेट किंवा बँकांच्या अॅपवर अॅटो पेमेंट सेट करावा. यासोबतच कंपन्या अॅटो पेमेंट केल्यास अन्य सुविधाही देतात. 

आरोग्य विम्यावर विचार करा : आरोग्य विमा काढलेला चांगलाच असतो. मात्र, त्यामध्ये बऱ्याचदा गरज नसलेल्या गोष्टी असतात. ज्याचे जादा पैसे भरावे लागतात. जसे की कॅन्सर कव्हर. जर तुम्हाला कॅन्सरचा धोका नसेल किंवा गरज नसेल तर या कव्हरचे पैसे का भरताय? अशाप्रकारचे कव्हर बंद करा. 

पोस्टपेड चे प्रिपेड मोबाईल कनेक्शन : पोस्टपेड मोबाईल कनेक्शनला जादा पैसे मोजावे लागतात. तेवढा वापरही नसतो. यामुळे हे पैसे वाया जातात. यापेक्षा प्रिपेड कनेक्शनला कमी पैशांत जास्त सुविधा मिळतात. तसेच प्रिपेड कनेक्शनला तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करता येतात. यामुळे त्याचा हिशोबही ठेवता येतो. त्यामुळे पोस्टपेडचे प्रिपेड कनेक्शन करावे.

टॅग्स :पैसाबँकमहागाई