Join us

सगळे कमी करताहेत, पण 'या' सरकारी बँकेनं वाढवले कर्जाचे व्याजदर; कोणती आहे बँक, किती झाले दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:28 IST

Loan Interest Rate Hike: रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अनेक बँकांनी आपले कर्जाचे व्याजदर कमी केले होते.

Loan Interest Rate Hike: रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अनेक बँकांनी आपले कर्जाचे व्याजदर कमी केले होते. दरम्यान, कर्जदारांसाठी एक वाईट बातमी येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेनं नुकतीच कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं आरबीआयच्या रेपो दराशी जोडलेल्या किरकोळ कर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्के वाढ जाहीर केली आहे. या वाढीनंतर इंडियन बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा व्याजदर ९.०५ टक्के होणार आहे. वाढीव व्याजदर गुरुवार, ३ एप्रिलपासून लागू झाले आहेत.

किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर परिणाम

इंडियन बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. इंडियन बँकेनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या मालमत्ता दायित्व व्यवस्थापन समितीनं (अल्को) फंडाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड इंटरेस्ट रेट (एमसीएलआर), ट्रेझरी बिल बेस्ड इंटरेस्ट (टीबीएलआर), बेस रेट, स्टँडर्ड प्राइम लेंडिंग रेट (बीपीएलआर) आणि रेपो-आधारित स्टँडर्ड इंटरेस्ट (आरबीएलआर) यांचा आढावा घेतला. बँकेने टीबीएलआर, बेस रेट, बीपीएलआर आणि आरबीएलआरमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो बेस्ड स्टँडर्ड इंटरेस्ट रेट (आरबीएलआर) सध्याच्या ८.९५ टक्क्यांवरून ९.०५ टक्क्यांवर जाईल.

रेपो दरात कपात करूनही कर्जे महाग

रिझर्व्ह बँकेनं गेल्या महिन्यात रेपो दर ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणला होता. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली असली तरी इंडियन बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ट्रेझरी बिलआधारित व्याजदर ६ महिने ते ३ वर्षांच्या मुदतीसाठी ०.०५ टक्क्यांनी कमी करून ६.५ टक्के करण्यात आला आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं आपला बेस रेट ०.०५ टक्क्यांनी कमी करून ९.८० टक्के केला आहे.

टॅग्स :बँक