Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट बंद असूनही तुमचा कॉम्प्युटर नाही सुरक्षित; होतोय सायबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:14 IST

प्रत्येक तिसरा वापरकर्ता सायबर हल्ल्याचा बळी; तब्बल ६.४६ कोटी हल्ले रोखले 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : इंटरनेट बंद ठेवले तरी संगणक पूर्णपणे सुरक्षित राहतो, हा समज धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. २०२५ मध्ये भारतातील जवळपास प्रत्येक तीनपैकी एक संगणक वापरकर्ता ऑफलाइन सायबर हल्ल्यांचा बळी ठरल्याचा धक्कादायक खुलासा ‘कॅस्परस्की’च्या अहवालातून झाला आहे.

कंपनीने जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान देशात तब्बल ६.४६ कोटी ‘लोकल’ सायबर हल्ले ओळखून रोखले. हे हल्ले प्रामुख्याने इंटरनेटशिवाय पसरवले जाणारे, यूएसबी ड्राइव्ह, बाह्य स्टोरेज आणि इतर रिमूव्हेबल माध्यमांद्वारे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारत ‘लोकल सायबर धोका’ सर्वाधिक असलेल्या जगातील पहिल्या ८० देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.

स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल? 

अनोळखी व्यक्तीचे किंवा संशयास्पद पेनड्राइव्ह आपल्या लॅपटॉप/कॉम्प्युटरला लावू नका.कॉम्प्युटरमध्ये नेहमी अपडेटेड अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ठेवा.‘ऑटो-रन’ फीचर बंद ठेवा, जेणेकरून पेनड्राइव्ह लावताच व्हायरस स्वतःहून सक्रिय होणार नाही.महत्त्वाच्या फाईल्सचा वेळोवेळी बॅकअप घ्या.अज्ञात फाइल्स उघडण्यापूर्वी स्कॅन करा. संवेदनशील माहिती शेअर करताना खबरदारी घ्या.

धोकादायक ट्रेंड : टीम्स, गुगल ड्राइव्हची नक्कल

वर्क फ्रॉम होम आणि हायब्रिड कामकाजाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय झाले आहेत. ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स’ आणि ‘गुगल ड्राइव्ह’सारख्या लोकप्रिय साधनांची नक्कल करून वापरकर्त्यांना फसवण्याचे प्रकार वाढल्याचेही संशोधनातून समोर आले आहे.

अशा बनावट फाइल्स किंवा लिंकद्वारे लॉगिन माहिती, बँकिंग तपशील आणि वैयक्तिक डेटा चोरण्याचे प्रकार घडत असल्याचे ‘कॅस्परस्की’चे आशिया-पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक ॲड्रियन हिया यांनी सांगितले. ‘कॅस्परस्की सिक्युरिटी नेटवर्क’च्या आकडेवारीनुसार, देशातील २९.८ टक्के वापरकर्त्यांना ऑफलाइन धोके अनुभवावे लागले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Offline Cyber Attacks Threaten Indian Computers Despite Internet Shutdowns

Web Summary : Even without internet, Indian computers face rising cyber threats. Kaspersky reports a significant number of offline attacks via USB drives. Stay safe by updating antivirus software, disabling auto-run, and backing up files. Cybercriminals mimic Teams and Google Drive to steal data, impacting nearly 30% of users.
टॅग्स :सायबर क्राइमधोकेबाजी