एस्सार समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचं २५ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. रुईया यांचं पार्थिव वाळकेश्वर येथील बाणगंगा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली.
एस्सार समूहाने एका निवेदनात रुईया यांच्या जागतिक स्थानातील योगदानाची आठवण करून दिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनही केलंय. शशी रुईया यांची त्यांना प्रशांत आणि अंशुमन ही दोन मुलं असून ते समूहाच्या नेतृत्वातही सामील आहेत.
पंतप्रधानांनी दिला आठवणींना उजाळा
"शशी रुईया हे इंडस्ट्रीमधील मोठे व्यक्तीमत्त्व होते. त्यांचं नेतृत्व आणि उत्कृष्टतेसाठीची बांधिलकी यामुळे भारतातील व्यावसायिक वातावरण बदललं. नावीन्य आणि विकासासाठी त्यांनी उच्च मानदंडही प्रस्थापित केले. त्यांच्याकडे नवनव्या कल्पनांचं भांडार होतं. आपल्या देशाची कशी प्रगती करता येईल यावर त्यांनी नेहमी चर्चा केली. शशीजींचे निधन अत्यंत दु:खद आहे," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
१९६५ मध्ये करिअरला सुरुवात
पहिल्या पिढीतील उद्योजक असलेल्या शशी यांनी १९६५ मध्ये वडील नंदकिशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. भाऊ रवी यांच्यासोबत सोबत मिळून त्यांनी एस्सार ग्रुपची स्थापना केली. त्यांनी एस्सारचं व्यवसाय धोरण, विकास, वृद्धी आणि विविधतेची रूपरेषा सांगितली.
शशी रुईया यांनी अनेक संस्था आणि उद्योग संघटनांमध्येही काम केलं आहे. ते फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य होते. ते भारत-अमेरिका संयुक्त व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष आणि इंडियन नॅशनल शिप ओनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. १९६५ मध्ये सुरू झालेल्या पंतप्रधानांच्या इंडो-यूएस करिअर फोरम आणि भारत-जपान बिझनेस कौन्सिलचेही ते सदस्य होते.एस्सार समूहाच्या वेबसाइटनुसार, रुईया बंधूंच्या प्रस्थापित व्यवसायांची मालकी असलेली एस्सार ग्लोबल फंड लिमिटेड पायाभूत सुविधा, ऊर्जा, धातू, खाणकाम, तंत्रज्ञान आणि विविध सेवा क्षेत्रात आहे.