Join us

भारतातील स्वस्त मोबाईल डाटा, कॉलचे युग संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 03:05 IST

१०० एसएमएसनंतरही मोफत संदेशास परवानगी

नवी दिल्ली : भारतातील दूरसंचार कंपन्या ‘दर अनुशासन’ पर्वात प्रवेश करीत असून, त्याचा परिणाम म्हणून देशातील स्वस्त मोबाईल डाटा व कॉलचे युग संपणार आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओचे आगमन झाल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ झाली. जीवघेण्या स्पर्धेमुळे मोबाइल डाटा व कॉलचे दर नगण्य झाले. तथापि, आता ही अनिश्चितता संपण्याची चिन्हे दिसून येत आहेत. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या ‘दर अनुशासन’ पर्वात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे स्वस्त दराचे युग संपेल. कंपन्यांचा प्रतिवापरकर्ता मोबाइल महसूल वित्त वर्ष २०२५ पर्यंत दुप्पट होईल, असे ‘जेफरीज’ने जारी केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, जगातील २५ देशांतील दूरसंचार बाजारांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात असे दिसून आले की, वित्त वर्ष २०२५ पर्यंत भारतात प्रतिवापरकर्ता मोबाइल महसूल दुपटीने वाढून ३८ अब्ज डॉलरवर जाईल.१०० एसएमएसनंतरही मोफत संदेशास परवानगीमोबाईलवरील दररोजची १०० एसएमएसची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रतिएसएमएस ५० पैसे आकारण्याचे कंपन्यांवरील बंधन ट्रायने हटविले आहे. याचाच अर्थ आता एका दिवसात एका सीम कार्डवरून १०० पेक्षा अधिक एसएमएस मोफत पाठविण्याची सुविधा दूरसंचार कंपन्या ग्राहकांना देऊ शकतील. व्यावसायिक एसएमएसना चाप बसविण्यासाठी १००च्या पुढील एसएमएससाठी प्रत्येकी ५० पैसे आकारण्याचा नियम होता. तथापि, त्याचा सामान्य ग्राहकांनाही फटका बसत होता. ट्रायने हा नियम रद्द केला.

टॅग्स :मुंबईव्यवसाय