Join us  

EPFO ची मोठी अपडेट, कोट्यवधी खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 9:14 AM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत, आता जर ईपीएफओ सदस्यानं नोकरी बदलली तर त्याची पीएफ रक्कम आपोआप नवीन कंपनीकडे ट्रान्सफर केली जाईल. यासाठी सदस्याला अर्ज करण्याची गरज नाही. हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. 

नवीन सुविधा सुरू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुन्या कंपनीकडून नवीन कंपनीकडे पीएफची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म-३१ भरावा लागणार नाही. यापूर्वी, नोकऱ्या बदलताना, पीएफ खातेधारकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असूनही अर्ज संबंधित औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या. या अंतर्गत एक विशेष फॉर्म-३१ भरून सबमिट करावा लागत होता. त्यानंतर काही दिवसांतच ही रक्कम नव्या कंपनीकडे ट्रान्सफर करण्यात येत होती. नवीन प्रणालीमध्ये, अनेक औपचारिकता पूर्ण करण्यापासून दिलासा मिळणार आहे. 

त्रुटीही राहणार नाहीत 

जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा नवीन कंपनी त्याचा UAN (पीएफ खातं) मध्ये जोडली जाते. त्याला ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन जुनं पीएफ खातं नवीन खात्याशी ऑनलाइन लिंक करावं लागतं. ईपीएफओ सदस्यांना या प्रक्रियेत अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा काहीतरी गडबड होण्याची शक्यताही असते. याशिवाय जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांना त्याची औपचारिकता पूर्ण करावी लागते. आता या प्रक्रियेत ईपीएफओ सदस्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. 

युएएन यासाठी गरजेचा 

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) पीएफ खातेधारकांसाठी सेंट्रलाईज्ड प्लॅटफॉर्म म्हणून काम करते. हे सदस्याला एकाच वेळी अनेक पीएफ खाती लिंक करण्याची परवानगी देते. याशिवाय UAN इतर सेवाही पुरवते. या अंतर्गत, ईपीएफओ ​​सदस्य त्याच्या मदतीनं त्याचे UAN कार्ड आणि PF पासबुक डाउनलोड करू शकतात. एकूण शिल्लक रकमेची माहिती एसएमएसद्वारे मिळू शकते.

 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीसरकार